

पिंपरी: मुंढवा येथील 40 हेक्टर जागेच्या खरेदी-विक्री घोटाळा प्रकरणातील आरोपी शीतल तेजवाणी हिच्या पुण्यातील कोरेगाव पार्क येथील भाड्याने राहत असलेल्या घराची बावधन पोलिसांनी शुक्रवारी (दि. 19) झाडाझडती घेतली. तसेच, पिंपरीतील तिच्या कार्यालयावरही पोलिसांचे पथक गेले होते; मात्र ते कार्यालय बँकेने सील केले असल्याने पोलिसांचे पथक माघारी परतले.
मुंढवा येथील महार वतन जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणात पुणे शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शीतल तेजवाणी हिला यापूर्वी अटक केली होती. तिच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने तिची रवानगी येरवडा कारागृहात केली होती. त्यानंतर बावधन पोलिसांनी मंगळवारी (दि. 16) न्यायालयाकडून प्रोड्यूस वॉरंट घेऊन येरवडा कारागृहातून तेजवाणी हिला अटक केली. सध्या ती बावधन पोलिसांच्या कोठडीत आहे.
तेजवाणी हिचे माहेर पिंपरी कॅम्प परिसरात असून, तेथे तिचे भाऊ वास्तव्यास आहेत. तर, शीतल तेजवाणी ही पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात भाड्याच्या घरात राहते. तपासाच्या अनुषंगाने बावधन पोलिसांनी शुक्रवारी (दि. 19) दुपारी तिच्या कोरेगाव पार्क येथील घराची झाडाझडती घेतली. या कारवाईदरम्यान काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. सदर कारवाईसाठी पुणे शहर पोलिसांचीही मदत घेण्यात आली.
रवींद्र तारूची न्यायालयीन कोठडीत रवानगी
मुंढवा येथील जागेच्या खरेदी-विक्री घोटाळा प्रकरणात दस्त नोंदणी करणारे सह दुय्यम निबंधक रवींद्र बाळकृष्ण तारू (वय 58, रा. भोर) याला बावधन पोलिसांनी 7 डिसेंबर रोजी अटक केली होती. सुरुवातीला आठ दिवसांची पोलिस कोठडी मिळाल्यानंतर न्यायालयाने 19 डिसेंबरपर्यंत त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याचे आदेश दिले होते.
तारू याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार, तारू याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.