

बेल्हे: श्रीस्वामी महाराज पुण्यतिथी शतकोत्तर महोत्सव सोहळा श्रीक्षेत्र आणे (ता. जुन्नर) येथे शनिवार (दि. 13) पासून सुरू होणार आहे. यावर्षी आलेल्या भाविकांसाठी 85 कढया आमटी केली जाणार आहे. शनिवारपासून अखंड हरिनाम सप्ताह व सामुदायिक श्री ज्ञानेश्वरी पारायणास सुरुवात होणार असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष मधुकर दाते यांनी दिली.
या उत्सवात दरवर्षी लाखो भाविक येतात. गर्दी नियंत्रणासाठी यावर्षी आलेल्या भाविकांना देवस्थानने वेगळा उपक्रम राबवला आहे. 85 पैकी अंदाजे 40 कढया आमटीचे घरी वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी 21 लाख सोळा हजार 548 रुपयांचा मसाला लागणार आहे.
देवस्थानला “ब” वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळाला आहे. श्रीरंगदास स्वामी पुण्यतिथीनिमित्त गेल्या 137 वर्षांपासून हरिनाम सप्ताह आयोजित केला जात आहे. आलेल्या भाविकांना महाप्रसाद म्हणून आमटी-भाकरी केली जाते. येथील आमटी-भाकरीची चव जगभरात प्रसिद्ध असून, लाखो भाविक स्वामींच्या दर्शनाला व महाप्रसाद घेण्यासाठी येत असतात. आसपासच्या गावांमधून भाविकांसाठी हजारो किलो भाकरी येतात. आलेल्या भाकरीचे वाजत गाजत स्वागत केले जाते. देवस्थान परिसरात आमटी केली जाते. याचा लाभ दोन दिवसांत लाखो भाविक घेत असतात.
शनिवारी सकाळी महापूजा व वीणापूजन होणार आहे. सकाळी काकडा भूपाळी, सामुदायिक श्री ग््रांथराज ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी प्रवचन, हरिपाठ, हरीकीर्तन, महाप्रसाद, जागर असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत. सप्ताहाच्या कालावधीत हभप रामदास महाराज दाते, हभप प्रेमानंद महाराज शास्त्री आंबेकर, हभप सागर महाराज बोराटे, हभप वैजनाथ महाराज थोरात, हभप संजय नाना धोंडगे, हभप ज्ञानेश्वर महाराज कदम छोटे माउली, हभप गोविंद महाराज गोरे यांची कीर्तनरूपी सेवा पार पडली.
शनिवारी (दि. 20) सकाळी 8 ते 10 भजन, 10 ते 12 श्री स्वामींच्या शाळिग््राामची मिरवणूक, 12 ते 1 महाआरती होणार आहे. त्यानंतर भाविकांना आमटी-भाकरीचा महाप्रसाद दिला जाणार आहे. सायंकाळी हभप भागवताचार्य चेतन महाराज शास्त्री यांच्या कीर्तनानंतर श्री स्वामींच्या पालखीची भव्य मिरवणूक होणार आहे. रविवारी सकाळी हभप कृष्णकृपांकित डॉ. विकासानंद महाराज मिसाळ यांचे काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर भाविकांना आमटी-भाकरीचा महाप्रसाद दिला जाणार आहे.