

Smart Meter Complaints Maharashtra
पिंपरी: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने विद्युत पुरवठ्यासाठी नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय घेतला. पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक भागांतील संबंधित वीज मीटर बदलले जात आहेत. मीटर बदलले त्यातील काही नागरिकांना पहिल्या बिलामध्येच वाढीव बिल आले आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
स्मार्ट मीटर बसवल्यानंतर हजार रुपये ऐवजी दीड ते दोन हजार रुपये बिल येत आहे. सध्या मुलांच्या शाळा सुरू झाला आहेत. शाळेचा खर्च वाढला आहे. त्यात वाढीव दराने वीजबिल येत असल्याने नागरिक वैतागले आहेत. (Latest Pimpri News)
बिल भरले नाही, तर वीजजोड कापून, असे कर्मचारी धमकावत आहेत. पूर्णानगर, चिंचवड येथील नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन महावितरणचे अधिकारी मुंडे यांना वाढीव दराचे वीजबिल जमा करून देण्यात आले. त्यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या संगणकावर ऑलनाईन बिल तपासले. जुने मीटर नादुरुस्त असल्याने ते संथ गतीने चालत होते. त्यामुळे बिल कमी येत होते, असे अधिकारी सांगत आहेत.
मीटर आम्ही बाजारातून खरेदी करून आणलेले नाहीत. मीटर महावितरणने बसविले आहेत, त्यात आमची काही चूक नाही. नवीन मीटर बसवल्याने वाढीव दराने आलेले बिल आम्ही भरणार नाही. त्या प्रकरणी वरिष्ठ अधिकार्यानी जनसंवाद घ्यावा, अन्यथा नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. या वेळी पूर्णानगर परिसरातील नक्षत्र फेज टू सोसायटीचे सचिव अजय संभाजी पाताडे, उपाध्यक्ष पंकज निकम, राजेश नागरे, सतीश श्यालेन, तसेच सोसायटीतील सभासद व नागरिक उपस्थित होते.