

गणेश विनोदे
वडगाव मावळ: मित्राचा बर्थ डे साजरा केला आणि महाबळेश्वरला फिरायला निघाले.. तेव्हा निखिलच्या बहिणीचा आज वाढदिवस असल्याने तिने त्याच्या मित्राला मेसेज करत माझ्या भावाला सुखरूप आणा... असा संदेश दिला; पण काळाने घाला घातला आणि ४ जिवलग मित्रांचा अंत झाला. इतकेच नाही, तर कुटुंबाचा एकुलता एक आधार असलेल्या आई-वडिलांना पोरके करून गेल्याची दुर्दैवी घटना आज पहाटे शिरवळ येथे घडली. यामुळे संपूर्ण मावळ तालुका हादरून गेला आहे. सदर घटना आज पहाटे शिरवळ येथे झालेल्या अपघाताने घडली.
पुणे-सातारा महामार्गावर शिरवळ (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे आज पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात मावळ तालुक्यातील चार युवकांचा जागीच मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाल्याने मावळ तालुक्यात शोककळा पसरली आहे. वेदांत अर्जून वारिंगे (वय १९, रा. तळेगाव दाभाडे), सोनलिंग धीरेंद्र ठाकूर (वय १९, रा. कामशेत), आदित्य बाळासाहेब गरुड (वय १९, रा. टाकवे) आणि निखिल बाळू राऊत (वय २०, रा. कामशेत) यांचा मृत्यू झाला. तसेच दीक्षित दयानंद पुजारी (२०, रा. कामशेत) आणि मयूर हनुमंत शिंदे (२०, रा. बऊर, कामशेत) हे दोघे जखमी झाले आहेत.
हे सर्वजण एकमेकांचे शाळा - कॉलेजचे मित्र असून, सोमवारी रात्री कामशेत येथे एका मित्राचा वाढदिवस असल्याने त्याचा केक कापून वाढदिवस साजरा केला आणि ते महाबळेश्वराकडे रवाना झाले. एकप्रकारे मैत्रीच्या दुनियेत आनंद साजरा करण्याच्या नादात या जिवलग मित्रांचा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. शिरवळ येथील हॉटेल शिवालयसमोर पहाटे सुमारे १.१० वाजता पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने त्यांची कार (एमएच १४ एलजे ३०३३) जात होती. त्या वेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार महामार्गाच्या डिव्हायडरला जोरात धडकली आणि पलटी होऊन महामार्गाच्या विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये जाऊन पडली. याच वेळी साताऱ्याच्या दिशेने विरुद्ध बाजूने येणाऱ्या ट्रकला (केए २७ सी ५८७८) कारची जोरदार धडक बसून हा भीषण अपघात झाला.
माझा भाचा वेदांत फक्त मित्रांसाठीच जगला!
वेदांत वारिंगे हा मूळचा वारंगवाडी येथील सांप्रदायिक परिवारातील एकुलता एक मुलगा. कुटुंबात आई-वडील व आर्किटेक्ट झालेली बहीण असा परिवार. कामशेतला मामाकडे वास्तव्यास असणारे हे कुटुंब चार दिवसांपूर्वीच तळेगाव दाभाडे येथे चुलते पिराजी वारिंगे यांच्या शेजारी राहायला आले होते. मित्रांना गाडी, जेवण, जॅकेट, कपडे अशा विविध गोष्टी मैत्रीपोटी पुरविणारा माझा भाचा फक्त मित्रांसाठीच जगला, अशी भावना त्याचे मामा अर्जून शिंदे यांनी व्यक्त केली. अंत्यविधीलाही मोठा मित्रपरिवार उपस्थित होता.
निखिलने मित्राचा बर्थ डे केला; पण बहिणीचा बर्थ डे हुकला!
निखिल राऊत हा मूळचा राऊतवाडी येथील असून, तो कामशेत येथे आईवडील व बहिणीसह वास्तव्यास होता. वडील आजारी असल्याने कुटुंबाला आधार देण्यासाठी शिक्षण घेत तो नुकताच कामालाही लागला होता. तसेच आज (मंगळवार) बहीण शुभांगी हिचा वाढदिवस होता. निखिलने जाण्यापूर्वी मित्राचा वाढदिवस साजरा केला; परंतु दुर्दैवाने बहिणीचा वाढदिवस त्याला साजरा करता आला नाही.
माझा बर्थडे आहे...
निखिल राऊत याची बहीण शुभांगी हिचा आज मंगळवार वाढदिवस होता. सोमवारी रात्री निखिल मित्रांसमवेत महाबळेश्वरला निघाला असता, शुभांगीने त्याच्या एका मित्राला फोनवर ''माझा उद्या वाढदिवस आहे, माझ्या भावाला नीट आणा'' असा मेसेज केला होता. जणू काही तिला जाणीवच झाली होती, अखेर जे नको तेच झाले.
आदित्य गेला अन् आई-वडिलांच्या स्वप्नाचा चुराडा झाला!
आदित्य गरुड हा टाकवे खुर्द येथील शेतकरी कुटुंबातील मुलगा. कुटुंबात आई-वडील आणि एक बहीण असा परिवार. गावातील एक हुशार व स्वभावाने चांगला असलेला आदित्य गेल्याने आई-वडिलांच्या स्वप्नांचाही चुराडा झाला.
परप्रांतीय पण शुद्ध मराठी बोलणारा.. सोनू !
सोनलिंग ठाकूर हाही कुटुंबात एकुलता एक परप्रांतीय कुटुंबातील असला तरी जन्म मावळातील असल्याने शुद्ध मराठी बोलणारा होता. कॉलेज करून कामशेत येथे एका व्यापाऱ्याच्या दुकानात काम करून आपल्या आईवडिलांना आधार देत होता.