

वडगाव मावळ: मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 5 व पंचायत समितीच्या 10 जागांसाठी 7 फेबुवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठी तालुक्यात एकूण 243 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार असून, 2 लाख 316 मतदारसंख्या असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिली.
शनिवारी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर सोमवारी (दि. 9) मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक व कायदेशीर पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली असल्याचेही नवले यांनी सांगितले. मावळ तालुक्यात एकूण 2 लाख 316 मतदार असून, यामध्ये 1 लाख 2 हजार 82 पुरुष, 98 हजार 226 महिला आणि आठ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. तसेच सोमाटणे-चांदखेड जिल्हा परिषद गटामध्ये सर्वांधिक 45 हजार 775 इतकी मतदार संख्या आहे. तर, काले पंचायत समिती गणामध्ये सर्वांधिक 24 हजार 199 इतकी मतदार संख्या आहे.
आज प्रचार होणार बंद
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नवीन कार्यक्रम बदलानुसार 5 फेबुवारी रोजी रात्री 10 वाजता प्रचार बंद होणार आहे. त्यामुळे प्रचाराचा शेवटचा दिवस जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. त्यादृष्टीने सर्वच पक्ष व उमेदवारांनी प्रचाराचे नियोजन केले आहे.
उद्या मतपेट्या होणार रवाना
मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव मावळ येथील तहसील कार्यालयातून उद्या (दि. 6) तालुक्यातील सर्व 243 मतदान केंद्रांवर मतपेट्या, मतदान साहित्यांसह मतदार कर्मचारी रवाना होणार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडेल, असा विश्वास निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी व्यक्त केला.
जि. प. गटनिहाय मतदारसंख्या
टाकवे बुद्रुक : नाणे 39,547
इंदुरी-वराळे : 36,280
खडकाळे-कार्ला : 39,103
कुसगाव बुद्रुक-काले : 39,611
सोमाटणे-चांदखेड : 45,775
पं. स. गणनिहाय मतदार संख्या
टाकवे बुद्रुक : 19,839
नाणे : 19,708
वराळे : 19,781
इंदुरी : 16,499
खडकाळे : 20,429
कार्ला : 18,674
कुसगाव बुद्रुक : 15,412
काले : 24,199
सोमाटणे : 22,811
चांदखेड : 22,964