

लोणावळा: दिवाळी संपल्यानंतर शनिवार, रविवार, सोमवार सलग सुट्या आल्याने कार्ला परिसरातील विविध पर्यटनस्थळे तसेच एकवीरा देवीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांमुळे परिसर गर्दीन फुलून गेला होता व भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यातच अचानक आलेल्या अवकाळी पावसाने आलेल्या भाविकांची धांदल उडाली. (Latest Pimpri chinchwad News)
पाच किमीपर्यंत वाहनांच्या रांगा
आई एकवीरा देवी, ऐतिहासिक कार्ला व भाजे लेणी, लोहगड, विसापूर किल्ला भागात पर्यटक कुटुंबातील सदस्यांसह फिरताना, मौजमजा करताना दिसत होते. पर्यटनाबरोबर महाराष्ट्रातील जनतेचे श्रद्धास्थान असलेली कार्ला आई एकवीरा देवीचे दर्शन घेण्यासाठी रविवारी कोळी, आगरी बांधव तसेच भाविक भक्तांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती. अचानक आलेल्या पावसाने रस्त्याच्याकडेला वाहने उभी केल्याने कार्ला-वेहेरगाव रोडवर वाहतूककोंडी झाली होती. तसेच, पुणे-मुंबई जुन्या महामार्गवरदेखील वाकसाई फाटा ते टाकवे फाट्यापर्यंत जवळपास 5 किमी अंतरावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
स्थानिक नागरिक त्रस्त
ही वाहतूककोंडी सोडविण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निरंजन जाधव, हवालदार भूषण कदम, होमगार्ड निवृत्ती मराठे, नागनाथ जगताप, साई तिखे, शांताराम कडू, विनोद इकारी आदी प्रयत्न करताना दिसत होते. काही स्थानिक नागरिकदेखील पोलिसांना वाहतूककोंडी सोडवण्यासाठी मदत करत होते. शाळांना सुटी असल्यामुळे दिवाळीचा व शाळांच्या सुट्यांचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात राज्यभरातून पर्यटक लोणावळा, खंडाळा, कार्ला, पवनानगर या सर्व परिसरामध्ये दाखल झाले आहेत.
पर्यटकांच्या वाहनांमुळे सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे स्थानिकांच्या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळाला असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. तर, दुसरीकडे वाहतूककोंडीमुळे त्रास सहन करावा लागत असल्यामुळे काही स्थानिक नागरिकांनी मात्र संतापदेखील व्यक्त केला आहे. आई एकवीरा देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना सुलभतेने दर्शन व्हावे याकरिता देवस्थानचे विश्वस्त मंडळ व कर्मचारी तसेच पोलिस प्रशासन प्रयत्नशील असल्याचे दिसून येत होते.
लोणावळा खंडाळा हाउसफुल
लोणावळा व खंडाळा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. पर्यटकांची संख्या व त्यांची वाहने यामुळे लोणावळा खंडाळा हाउसफुल झाला असून, येथील बहुतांश सर्वच हॉटेल व खासगी बंगले हे पर्यटकांनी फुलले आहेत. लोणावळा शहरातील व मुख्य महामार्गावर सर्वत्र पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. भुशी धरण परिसर, लायन्स पॉईंट, खंडाळा येथील राजमाची गार्डन व खंडाळा बोटिंग क्लब, तुंगार्ली धरणाचा परिसर या सर्व भागांमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने दिसून येत होते. सहारा पूल व पुणे रायगड जिल्ह्याला जोडणारा अमृतांजन पूल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक थांबून निसर्गाचा आनंद घेत होते.