

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी ते दापोडीपर्यंत मेट्रो धावत आहे. मेट्रो स्टेशनखाली पार्किंगची सुविधा नसल्याने शेकडो वाहने बेशिस्तपणे पदपथ व रस्त्याच्याकडेला लावली जात आहेत. त्यामुळे वाहतुकीस तसेच, पादचाऱ्यांना अडथळे निर्माण होत आहे.
महामेट्रोने पार्किंगची सुविधा निर्माण करावी, अशी मागणी वाढत असताना, महामेट्रो व्यवस्थापनाने पार्किंग उभारले जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. परिणामी, पार्किंगची समस्या कायम राहणार असल्याचे दिसत आहे. (Latest Pimpari chinchwad News)
शहरात पिंपरी, संत तुकारामनगर, नाशिक फाटा, कासारवाडी, फुगेवाडी व दापोडी हे सहा मेट्रो स्टेशन आहेत. त्या पुढे स्वारगेट तसेच, वनाज व रामवाडीपर्यंत मेट्रोने ये-जा करता येते. मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
गणेशोत्सवात नागरिकांचा विक्रमी प्रतिसाद मिळाला. मेट्रो अक्षरश: गर्दीने तुडूंब भरून वाहत होती. पिंपरी मेट्रो स्टेशन येथून महामेट्रोला सर्वाधिक उत्पन्न मिळत आहे.
मात्र, मेट्रो स्टेशनखाली पार्किंग विकसित करण्यात मेट्रो व्यवस्थापनाकडून टाळाटाळ केली जात आहे. पार्किंगसाठी महामेट्रोला महापालिकेने अनेक मोक्याच्या जागा मोफत दिल्या आहेत. असे असताना महामेट्रोने पार्किंग विकसित करणे गरजेचे होते. महामेट्रोने सशुल्क पार्किंग झोन तयार करण्याचेही घोषित केले होते. मात्र, पार्किंगची सोय नसल्याने प्रवाशी पदपथ व रस्त्याच्याकडेला वाहने लावत आहेत. सकाळी सहापासून रात्री बारापर्यंत मेट्रो
स्टेशनखाली तसेच, परिसरात वाहने लागलेली असतात. त्यात रिक्षाचालक व कॅबचालक स्टेशनभोवती गर्दी करत असल्याने वाहतूक कोंडी भर पडते. मेट्रोने पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी वाढती मागणी असताना महामेट्रोने पार्किग झोन निर्माण न करण्याची भूमिका घेतली आहे.
मेट्रो प्रवाशांनी घर किंवा कामाच्या ठिकाणापासून खासगी वाहनाने न येता, बस, रिक्षा किंवा कॅबने यावे. त्यामुळे पार्किंगची गरज भासणार नाही, असे महामेट्रोचे मत आहे. परिणामी, पार्किंग झोन नसल्याने मेट्रो स्टेशन खाली व परिसरात पार्क केलेल्या वाहनांची गर्दी बारा महिने पाहायला मिळणार असे दिसत आहे.
मेट्रो प्रवाशांनी खासगी वाहन वापरू नये
मेट्रोने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी स्वत:चे खासगी वाहन वापरू नये. त्यांनी घर किंवा कामाच्या ठिकाणाहून निघताना पीएमपी बस किंवा रिक्षा या पर्यायी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा. त्यामुळे त्यांना पार्किंग झोनची गरज भासणार नाही. अनेक प्रवासी सकाळी मेट्रो स्टेशन परिसरात वाहन लावून जातात. ते रात्री उशिरा वाहने घेऊन जातात.
त्यामुळे पार्किंगची जागा दिवसभर अडकून पडते. इतर प्रवाशांच्या वाहनांना जागा उपलब्ध होत नाही. या सर्व बाबींचा विचार करून महामेट्रो व्यवस्थापन मेट्रो स्टेशन परिसरात पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देणार नाही, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.