

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेत डुडुळगाव येथे 1 हजार 190 सदनिकांचा गृहप्रकल्प उभारत आहे. त्यासाठी 168 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्या खर्चात वारंवार वाढ केली जात आहे. बांधकामाच्या पिलरची खोली वाढल्याने 52 लाख 7 हजार 397 रुपयांनी खर्च वाढला आहे. तो खर्च महापालिका संबंधित ठेकेदाराला देणार आहे.
या गृहप्रकल्पात पाच इमारती उभारण्यात येत आहेत. ते काम गुजरात येथील शांती कन्स्ट्रक्शन प्रा. लि.कडून केले जात आहे. कामास 23 मे 2023 ला सुरूवात करण्यात आली आहे. येथील सदनिकांसाठी नागरिकांकडून गेल्या वर्षी अर्ज मागविण्यात आले होते. एका सदनिकेसाठी पात्र लाभार्थ्यास 14 लाख 14 हजार 173 रूपये भरावे लागणार आहेत. (Latest Pimpari chinchwad News)
या कामाची मुदत अडीच वर्षे आहे. इमारतींचे फुटींग करताना अधिक प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे बांधकामांचा खर्च वाढला आहे. तो खर्च द्यावा अशी मागणी संबंधित ठेकेदाराने केली होती. त्यानुसार, प्रकल्प सल्लागार क्रिएशन्स इंजिनिअर्स प्रा. लि.ने महापालिकेकडे तशी शिफारस केली होती. त्यामुळे वाढीव 52 लाख रुपये खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.