

गणेश विनोदे
वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायत निवडणुकीत वडगाव शहरात नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या सर्वच जागांसाठी चुरशीची लढत रंगणार असल्याचे दिसते. 17 जागांपैकी 7 प्रभागांमध्ये भावकी-भावकीत तर 7 प्रभागांमध्ये दोन भावकीत लढत आहे, त्यामुळे जवळपास सर्वच प्रभागात काँटें की टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीने माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या पत्नी अबोली डोरे यांना तर भाजपने माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर यांची मुलगी ॲड. मृणाल म्हाळसकर यांना उमेदवारी दिली असल्याने नगराध्यक्ष पदासाठी शहरातील दोन प्रमुख मातब्बर घराणी असलेल्या ढोरे व म्हाळसकर या दोन भावकीत सरळ लढत होणार आहे. तसेच, नगराध्यक्षपदासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वैशाली उदागे, अपक्ष उमेदवार नाजमाबी शेख याही रिंगणात आहेत.
प्रभाग 2 मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार प्रवीण ढोरे व भाजपचे उमेदवार दिनेश ढोरे प्रभाग चारमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनीता ढोरे व भाजपचे उमेदवार पूजा ढोरे प्रभाग 9 मध्ये भाजपच्या उमेदवार सुप्रिया चव्हाण व अपक्ष उमेदवार सारिका चव्हाण, प्रभाग 15 मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र कुडे व भाजपचे उमेदवार अनंता कुडे अशी भावकी-भावकीमध्ये सरळ लढत होणार आहे.
प्रभाग 6 मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार मयूर ढोरे व भाजपचे उमेदवार विशाल वहिले, प्रभाग 8 मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार माया चव्हाण व भाजपच्या उमेदवार वैशाली म्हाळसकर, प्रभाग 10 मध्ये राष्ट्रवादीच्या आकांक्षा वाघवले व भाजपच्या सुजाता भेगडे, प्रभाग 11 मध्ये राष्ट्रवादीचे सुनील ढोरे व भाजपचे किरण म्हाळसकर, प्रभाग 13 मध्ये राष्ट्रवादीचे अजय म्हाळसकर व भाजपचे विनायक भेगडे, प्रभाग 15 मध्ये राष्ट्रवादीच्या अर्चना ढोरे व भाजपच्या अर्चना म्हाळसकर अशी दोन मातब्बर भावकीमध्ये सामना रंगणार आहे.
वडगाव शहरातील प्रमुख घराणी असलेल्या ढोरे आडनावाचे 11 उमेदवार रिंगणात आहेत. तर, म्हाळसकर आडनावाचे 8 उमेदवार रिंगणात असून, नगराध्यक्ष पदासाठीही ढोरे विरुद्ध म्हाळसकर अशी लढत आहे. त्यामुळे ढोरे व म्हाळसकर या दोन घराण्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
प्रभाग 5 मध्ये राष्ट्रवादीच्या वैशाली ढोरे व भाजपच्या अश्विनी म्हाळसकर या दोन भावकीच्या लढतीत रूपाली ढोरे तर प्रभाग 12 मध्ये राष्ट्रवादीचे गणेश म्हाळसकर व भाजपचे राजेंद्र म्हाळसकर या भावकी भावकीच्या लढतीत अपक्ष उमेदवार अतुल वायकर तसेच प्रभाग 16 मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार मीनाक्षी ढोरे व भाजपच्या उमेदवार राणी म्हाळसकर दोन भावकींच्या लढतीत अपक्ष उमेदवार सायली म्हाळसकर या अपक्षांचा समावेश असल्याने या प्रभागांमध्ये तिरंगी लढत रंगणार आहे. एकंदर, शहरातील प्रमुख घराण्यांपैकी मातब्बर असलेल्या ढोरे व म्हाळसकर या दोन घराण्यांमध्ये नगराध्यक्ष पदासह काही प्रभागात सरळ लढत रंगणार आहे. तसेच, काही प्रभागांमध्ये ढोरे, म्हाळसकर, चव्हाण, कुडे या आडनावांच्या भावकी भावकीमध्ये सामना रंगला आहे. तसेच, काही ठिकाणी भावकीच्या लढतीत दुसरी भावकी, तर दोन भावकीच्या लढतीत भावकीचाच उमेदवार असल्याने या लढतीही रंगतदार होणार आहे.