

लोणावळा: थर्टी फर्स्ट व न्यू इयरचा आनंद साजरा करण्यासाठी लोणावळा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. यामुळे पर्यटकांनी शांततेत आनंद साजरा करावा. शहरात हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती लोणावळा शहर पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी दिला आहे.
पर्यटकांच्या गर्दीने शहर गजबजले
पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी सांगितले, की शहरातील बहुतांश हॉटेल, खासगी बंगले व फार्म हाऊस पर्यटकांनी गजबजले आहेत. या पार्श्वभूमीवर लोणावळा शहर पोलिसांच्यावतीने सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला आहे. शहरामध्ये थर्टी फर्स्ट व न्यू इयरचा आनंद साजरा करण्यासाठी आल्यानंतर आपण तो शांततेमध्ये साजरा करावा. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच, सार्वजनिक ठिकाणी कोणतीही हुल्लडबाजी खपवून घेतली जाणार नाही. हुल्लडबाजी व शांततेचा भंग केल्यास पोलिस कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा लोणावळा शहर पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी दिला आहे.
कायदा व सुव्यवस्था पाळा
थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले लोणावळा शहर हे पर्यटकांचे कायमच आकर्षण राहिले आहे. थर्टी फर्स्ट व न्यू इयर साजरा करण्यासाठी दरवर्षी येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. येणाऱ्या पर्यटकांसाठी येथील हॉटेल्स व रिसॉर्टमध्ये वेगवेगळे मनोरंजनाचे कार्यक्रमदेखील आयोजित केले जातात. प्रत्येकाच्या स्वागतासाठी लोणावळा शहर सज्ज झाले आहे. जास्तीत जास्त पर्यटकांनी या ठिकाणी येऊन येथील निसर्गाचा व कार्यक्रमांचा आनंद घ्यावा. मात्र, हे करत असताना शांततेचा भंग होणार नाही आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याचीदेखील काळजी पर्यटकांनी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पर्यटनस्थळांवर बंदोबस्त वाढवला
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग व पर्यटनस्थळांवर बंदोबस्त वाढवला आहे. कोणताही अनुचित प्रकार पर्यटनस्थळी घडू नये, याकरिता साध्या वेशातील पोलिसांचे विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यासाठी ब्रेथ एनालायझर मशिन कार्यान्वित करण्यात आली असून, संशयित वाहनचालकांची तपासणी करण्यात येत आहे. रस्त्यावर कोठेही वाहने उभे करत मोठ्या आवाजात गाणे लावत नाचणे, आरडाओरडा करणे असे प्रकार आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
शहर परिसरात वाहतूक कोंडी
पर्यटकांच्या वाढलेल्या संख्येमुळे लोणावळा शहर परिसरात सर्वत्र मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यांवरदेखील वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.