

पिंपरी: भाजपाचे शहराध्यक्ष विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेत्याचे पॅनेल अशी सरळ लढत या प्रभागात पाहावयास मिळणार आहे. भाजपा की राष्ट्रवादी बाजी मारणार की नुरा कुस्ती होणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
गेल्या निवडणुकीत भाजपाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे व माजी नगरसेविका निर्मला कुटे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विरोधी नेते नाना काटे, त्यांच्या पत्नी शीतल काटे हे विजयी झाले होते. शहरात विजयी होणारे ते एकमेव दांपत्य आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे दोघांचे प्रत्येक दोन नगरसेवक असे प्रभागातील बलाबल आहे. भाजपाकडून शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी नगरसेविका निर्मला कुटे यांच्यासह जयनाथ काटे, कुंदा भिसे, संजय भिसे, कैलास कुंजीर, संदीप काटे पाटील, अनिता संदीप काटे, राणी काटे, सुप्रिया पाटील, जाचक व इतर इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून नाना काटे, शीतल काटे यांच्यासह मीनाक्षी अनिल काटे, सायली उमेश काटे व इतर इच्छुक आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून विशाल जाधव इच्छुक आहेत. तसेच, इतर पक्षांकडूनही काही जण इच्छुक आहेत. भाजपाकडे इच्छुकांची संख्या अधिक असल्याने बंडखोरी उद्धवू शकते. भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा युतीतील मित्रपक्षाचा सामना या प्रभागात पाहायला मिळणार आहे.
प्रभागातील परिसर
फाईव्ह गार्डन, शिवार गार्डन, प्लॅनेट मिलेनीयम, कापसे लॉन, रामनगर, पिंपळे सौदागर, कुणाल आयकॉन, रोझ लॅण्ड सोसायटी, गोविंद गार्डन, लिनिअर गार्डन आदी.
आंतरराष्ट्रीय क्लायम्बिंग वॉलमुळे खेळाडूंची सुविधा
पिंपळे सौदागर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्लायम्बिंग वॉल तसेच, योगा पार्क उभारण्यात आला आहे. त्याचा लाभ खेळाडू तसेच, नागरिक घेत आहेत. राजमाता जिजाऊ उद्यानात वेस्ट टू वंडर संकल्पनेतून नव्याने सुशोभिकरण करण्यात आले आहे. गावठाणात शिवछत्रपती क्रीडा संकुल विकसित करण्यात आले आहे. कुणाल आयकॉन रस्ता येथे बहुउद्देशीय क्रीडांगणाचे काम पूर्ण झाले आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत येथील रस्ते अद्ययावत पद्धतीने विकसित करण्यात आले असून, ड्रेनेजलाईन, जलवाहिनी व स्ट्रॉम वॉटरलाईन टाकण्यात आली आहे. संरक्षण विभागाचा रस्ता विकसित केला आहे. जगताप डेअरी, साई चौक येथे अंडरपास केल्याने वाहतुक सुरळीत झाली आहे.
प्रभागातील जागांचे आरक्षण
अ-ओबीसी
ब-सर्वसाधारण महिला
क-सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूककोंडी
शहरातील नियोजनबद्ध पद्धतीने विकसित झालेला हा स्मार्ट प्रभाग आहे. नामांकित हाऊसिंग सोसायट्या, टोलेजंग इमारती, प्रसिद्ध शॉपींग मॉल, हॉटेल्स, बाजारपेठ, दुकाने, शो रुम्स, शैक्षणिक संस्था, वास्तव्यास असलेले आयटीयन्स तसेच, काही भागात बैठी घरे व रो हाऊस आदींमुळे हा भाग वर्दळीचा झाला आहे. या भागांतील हाऊसिंग सोसायटींच्या पदाधिकाऱ्यांसह रहिवाशी जागृत आहेत. प्रभागात प्रशस्त रस्ते असले तरी, बेशिस्त पार्किंग, विक्रेत्यांचे अतिक्रमण आदी कारणांमुळे वाहतूककोंडी होत आहे. हॉकर्स झोन नसल्याने विक्रेते रस्त्यावर व चौकांत ठाण मांडतात. नदी प्रदूषण वाढले आहे. नदीकाठी तसेच, मोकळ्या जागेत मद्यपीचा अड्डा बनला आहे. सोसायट्यांना विशेषत: उन्हाळ्यात पुरेसा पाणी मिळत नसल्याने खासगी टँकरने पाणी खरेदी करावे लागते. सोसाटीतील भाडेकरुंच्या पार्ट्याचा त्रास होतो. लिनिअर गार्डनमधील साहित्य तुटले असून, त्याची दुरवस्था झाली आहे. स्वच्छतागृह वारंवार बंद असते. पार्किंग झोनची कमतरता असल्याने वाहने रस्त्यावर उभी केली जातात. अनधिकृतपणे पत्राशेड उभारले जात असल्याने विद्रुपीकरण वाढत आहे.