

लोणावळा: दख्खनचे पठार आणि कोकण किनारपट्टी यांना जोडणारी सह्याद्रीची अभेद्य रांग ही पूर्वी व्यापारासाठी एक मोठे आव्हान होती. सातवाहन काळातील अरुंद पायवाटांपासून सुरू झालेला हा प्रवास आज आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कार मानल्या जाणाऱ्या कनेक्टिंग लिंक (मिसिंग लिंक) प्रकल्पापर्यंत येऊन पोहचला आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून लोकांसाठी खुला झालेला हा मार्ग केवळ रस्ता नसून महाराष्ट्राच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाची नवी जीवनवाहिनी ठरला आहे.
सातवाहन ते बिटिश : प्रवासाची उत्क्रांती
सह्याद्री ओलांडण्याची गरज प्रामुख्याने व्यापारामुळे निर्माण झाली. सातवाहन काळात सोपारा, कल्याण आणि चौल या बंदरांवरून येणारा रोमन सामाज्याचा माल दख्खनमध्ये पोहोचवण्यासाठी घाटवाटांचा वापर होत असे. मध्ययुगीन काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी या घाटांचे सामरिक महत्त्व ओळखून लोहगड आणि विसापूर सारख्या किल्ल्यांच्या माध्यमातून त्यावर नियंत्रण मिळवले. 1830 च्या दशकात बिटिशांनी या मार्गाचे रूपांतर दगडी रस्त्यात केले आणि 1863 मध्ये रेल्वेच्या रूपाने सह्याद्रीतून पहिला लोहमार्ग धावला.
आधुनिक युगाचा प्रारंभ; द्रुतगती मार्ग ते कनेक्टिंग लिंक
पुणे मुंबई प्रवासाची गरज लक्षात घेता खंडाळा बोरघाटामधून महामार्गाची निर्मिती करण्यात आली. सह्याद्रीच्या अभेद पर्वतरांगेमधून नागमोडी वळणे घेणारा व वाहनचालकाला धडकी भरवणारा मार्ग निर्माण करण्यात आला. या मार्गावरील कसरत व वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी 2002 मध्ये देशातील पहिला सहा पदरी मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग सुरू झाला आणि प्रवासाचे समीकरणच बदलले. मात्र, खंडाळा घाटातील अवघड वळणे आणि अपघात यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी 6,695 कोटी रुपये खर्चाचा कनेक्टिंग लिंक प्रकल्प हाती घेण्यात आला. खोपोली ते कुसगाव दरम्यानचा हा मार्ग प्रवासाचे अंतर 6 किलोमीटरने आणि वेळ 30 मिनिटांनी कमी करतो.
पुण्याच्या विकासाला मिळाली नवी दिशा
या वेगवान संपर्कामुळे पुणे हे केवळ शैक्षणिक केंद्र न राहता जागतिक दर्जाचे आयटी आणि ऑटोमोबाईल हब बनले आहे. हिंजवडी, चाकण, तळवडे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील औद्योगिक क्रांतीमागे या मार्गाचा मोठा वाटा आहे. रिअल इस्टेट, पर्यटन आणि विकेंड संस्कृतीमुळे या संपूर्ण पट्ट्याचा चेहरामोहरा बदलला आहे. हजारो वर्षांपूर्वीच्या त्या अरुंद पायवाटा आणि आजचा हा हाय-टेक महामार्ग, हा प्रवास महाराष्ट्राच्या जिद्दीचा आणि प्रगतीचा जिवंत पुरावा आहे. मिसिंग लिंकच्या या नव्या अध्यायामुळे मुंबई-पुणे हे अंतर आता केवळ भौगोलिक न राहता आर्थिक प्रगतीचा एक अखंड दुवा बनले आहे.
पर्यटन व्यवसायाला मिळणार मोठी चालना
लोणावळा, खंडाळा व मावळ तालुक्यातील पवन मावळ, आंदर मावळ येथील पर्यटन व्यवसायाला या कनेक्टिंग लिंक प्रकल्पामुळे मोठी चालना मिळणार आहे. मुंबईहून पुणे व लोणावळा भागामध्ये येण्याचे अंतर या मार्गामुळे कमी झाले असून, वाहतूक कोंडीमुक्त प्रवास करतात येणार असल्यामुळे मावळ तालुक्यातील पर्यटन व्यवसायाला मिळणार आहे. पूर्वी या भागात येण्यासाठी वाहतूक कोंडी हा मोठा अडसर होता. खंडाळा घाटातील वाहतूक कोंडीची समस्या मिसिंग लिंकमुळे सुटली असून, त्याचा निश्चितच चांगला परिणाम या भागातील पर्यटन व्यवसायावर होणार आहे.
अभियांत्रिकीचा आविष्कार, जागतिक विक्रम
या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील बोगदा 22.33 मीटर रुंदीच्या या बोगद्याची जगातील सर्वाधिक रुंद भूमिगत बोगदा म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. याचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.