

लोणावळा: महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कोळी, आग्री, सीकेपी, सोनार अशा विविध समाजांची कुलस्वामिनी असलेल्या कार्ला गडावरील आई एकवीरा देवीचा मानाचा पालखी सोहळा चैत्र शुद्ध सप्तमीला (दि. 25) सायंकाळी 5.30 वाजता कार्ला गडावर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. आई माऊलीचा उदो उदो, आई आयलो च्या नामघोषाने अवघा कार्ला गड दुमदुमला होता.
गडावर भाविकांची गर्दी
पालखी मिरवणूक सोहळा शांततेमध्ये पार पडावा याकरिता श्री एकवीरा देवस्थान ट्रस्ट, पोलिस प्रशासन व तालुका प्रशासन यांनी उत्तम नियोजन केले होते. कडक पोलिस बंदोबस्तात पालखीचे मानकरी असलेल्या चौल, आग्राव, ठाणेकर व पेणकर यांनी पालखीला खांदा लावत विश्वस्तांच्या उपस्थितीत आई राजा उदो... उदोचा गजर केला. या वेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी व सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी भाविकांनी गडावर तुफान गर्दी केली होती. गडावर पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखी सोहळा पार पडला.
कोकणातून पालख्या दाखल
महाराष्ट्रातील जागृत देवस्थान अशी ख्याती असलेल्या कुलस्वामिनी आई एकवीरा देवीच्या यात्रेकरिता कोकणातून शेकडो पायी पालख्या गडावर आल्या होत्या. मागील काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी पालखी सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. मोठ्या श्रद्धेने व मनोभावे भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. अनेकांनी नवस फेडले, यात्रेकरिता कार्ला व वेहेरगावचा परिसर सजला होता. हारफुले, प्रसाद, कूंकू व खेळणी विक्रेते यांची दुकाने साहित्यांनी सजली होती. येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये याकरिता श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे व विश्वस्त मंडळ, तालुका प्रशासन व पोलिस विभाग यांच्याकडून सातत्याने विविध विभागांच्या बैठका घेत नियोजन करण्यात आले होते.
350हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त
बंदोबस्तासाठी 350हून अधिक पोलिस तैनात करण्यात आले होते. भाविकांची गर्दी लक्षात घेता लोणावळा ते वडगाव अवजड वाहनांना बंदी तर कार्ला फाटा ते पायथा व पार्किंगदरम्यान वाहनबंदी करण्यात आली होती. वाहनतळाचे योग्य नियोजनामुळे रस्ते खुले राहिल्याने भाविकांनीदेखील समाधान व्यक्त केले. तसेच, गडाच्या पायऱ्याचे रुंदीकरण व पाच पायरी मंदिर ते मुख्य मंदिरापर्यंत रेलिंग लावल्यामुळे गड चढताना व उतरताना भाविकांना त्रास झाला नाही. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे व मुख्य विश्वस्त खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांच्या हस्ते पहाटे देवींचा अभिषेक संपन्न झाला. देवीचा गर्भ गाभारा व मंदिराचा परिसर फुलांनी सजविला होता.
षष्ठी, सप्तमीला 24 तास मंदिर खुले
मावळ तालुक्याचे तहसीलदार विक्रम देशमुख, लोणावळा उपविभागाचे पोलिस अधिकारी गजानन टोम्पे, लोणावळा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे, लोणावळा शहरचे पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्यासह देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे, उपाध्यक्ष सागर देवकर, मारुती देशमुख, सचिव नवनाथ देशमुख, खजिनदार संजय गोविलकर, सह खजिनदार विकास पडवळ, महेंद्र देशमुख, सरपंच विश्वात अर्चना देवकर, पोलिस पाटील अनिल पडवळ, संजय जाधव यांनी यात्रेचे योग्य नियोजन केले होते. यात्राकाळात भाविकांना सहज दर्शन उपलब्ध व्हावे, याकरिता देवीचे मंदिर षष्ठी व सप्तमी असे दोन दिवस सलग 48 तास दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले आहे. तेलवणाच्या दिवशी अष्टमीलादेखील भाविकांच्या गर्दीनुसार मंदिर खुले ठेवले जाणार आहे.