

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीचा बार दिवाळीनंतर उडणार आहे. त्यामुळे शहरात इच्छुक जोमाने कामाला लागले आहेत. आखाड पार्टीचे आयोजन करून विविध मंडळे, संस्था, क्लब, चाळ, वस्ती, व्यापारी संघ, हाऊसिंग सोसायट्यांना आमंत्रित केले जात आहे. त्याद्वारे मतदार जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या पार्टीला होणार्या गर्दीतून आपली ताकद दाखविली जात आहे.
महापालिका निवडणुकीची अनेक महिन्यांपासून असलेली प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर निवडणूक दिवाळीनंतर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे इच्छुकांसह माजी नगरसेवक जोमाने तयारीला लागले आहेत. अनेकांनी आपले जनसंपर्क कार्यालय पुन्हा सुरू केले आहे. सोशल मीडियावर अनेक जण अॅक्टिव्ह झाले आहेत. विविध माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आषाढ महिन्याच्या अखेरीस आखाड पार्ट्याचा जोर चढतो. येत्या शुक्रवार (दि.25 ) पासून श्रावण महिना सुरू होत आहे. त्यामुळे गुरूवार (दि.24) पर्यंत आखाड पार्ट्याचे आयोजन शहरातील अनेक इच्छुकांनी केले आहे. आपल्या प्रभागातील विविध मंडळे, संस्था, क्लब, वस्ती, चाळ, व्यापारी संघ, हाऊसिंग सोसायट्यांना आखाड पार्ट्यासाठी खास आमंत्रित केले जात आहे. त्यात चिकन, मटन व माश्यांची मेजवानी दिली जात आहे. या पार्ट्याचे आयोजन फार्म हाऊस, शेत, हॉल, मंगल कार्यालये, हॉटेल्स आदी ठिकाणी केले जात आहे. त्यात महिला कार्यकर्त्या मागे नसून, त्यांच्यासाठी विशेष स्वतंत्र पार्ट्या दिल्या जात आहेत.
पार्टीला होणार्या गर्दीतून इच्छुक आपला प्रचार करीत आहेत. गर्दीचा तसेच, सणाचा प्रचारासाठी वापर केला जात आहे. त्यातून जनसंपर्क वाढवून मतदारांना आपलेसे केले जात आहे. त्यात प्रभागातील मित्रमंडळी, मतदार व सक्रिय कार्यकर्त्यांना आवर्जून निमंत्रण दिले जात आहे.
पार्टी झाल्यानंतर गर्दीचे छायाचित्र सोशल मीडीयावर व्हायरल केले जात आहेत. त्यातून आपली ताकद दाखविली जात आहे. शहरभरात इच्छुकांकडून आखाड पार्ट्या आयोजित करून आपल्या प्रचार करून घेत आहेत. कार्यकर्ते आणि नागरिकही या संधीचा लाभ उठवत, चिकन, मटन व फीशवर ताव मारत पार्टीचा आनंद लुटत आहेत.