

पिंपरी : सांगवी परिसरात एका पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. विशेष म्हणजे त्याच्याजवळच पत्नी मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नीची हत्या करून पतीने आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त होत आहे.
शाम वाघेला (वय ५०) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव असून, त्यांची पत्नी राजश्री शाम वाघेला (वय ४५) यांचा मृतदेह घरात आढळून आला. राजश्री यांच्या तोंडातून रक्तस्त्राव झाल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना सांगवी येथील हनुमान चौक परिसरात गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. (Pcmc Latest News)
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाघेला दांपत्य घरी दोघेच राहत होते. त्यांना दोन विवाहित मुली आहेत. राजश्री वाघेला या पिंपरीतील शाळेत शिक्षिका आहेत तर शाम वाघेला यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. मात्र, शाम वाघेला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत होते. यावरून रात्री उशिरा दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता. राजेश्री वाघेला यांनी वादानंतर आपल्या मुलीला फोन करून याबाबत माहिती दिली होती. "उद्या सकाळी येऊन भेटते" असे मुलीने सांगितले होते.
दरम्यान, आज सकाळी मुलगी सांगवी येथील घरी गेल्यानंतर दरवाजा ठोठावला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने तिने इतर नातेवाईकांना बोलावले. दरवाजा तोडल्यावर समोरचा दृश्य अंगावर शहारा आणणारा होता. वडिलांनी गळफास घेतलेला तर आई मृतावस्थेत आढळली.
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विवाहित मुलींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. सांगवी पोलिस तपास करत आहे.
"शाम वाघेला यांनी गळफास घेतला आहे. त्यांची पत्नी मृत अवस्थेत आढळलेली आहे. अद्याप ही हत्या आहे की आणखी काही, याबाबत तपास सुरू आहे."
जितेंद्र कोळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सांगवी पोलीस ठाणे