

पिंपरी : शेअर ट्रेडिंगचे काम करणाऱ्या एका व्यक्तीला ट्रेडिंगमध्ये मोठा नफा देण्याचे आमिष दाखवून त्याची दोन कोटी 24 लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी पुण्यातील एका व्यावसायिकाला अटक केली आहे.(Latest Pimpri chinchwad News)
संतोष सदाशिव रुपनर (47, रा. मांजरी बुद्रुक, पुणे) असे अटक केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. फिर्यादी व्यक्ती शेअर ट्रेडिंगचे काम करतात. त्यांना एका व्हॉट्सॲप गृपमध्ये राजीव भाटिया नावाच्या व्यक्तीने ॲड केले होते. या गृपचे ॲडमिन दीपक नायर, राजीव भाटिया आणि अन्य एक अज्ञात व्यक्ती होते. तसेच दुसऱ्या गृपमध्ये गौरव मिश्रा, पवित्रा वर्मा, यशवंत राव यांच्यासह इतर लोकांनी फिर्यादीला ॲड केले होते. या दोन्ही गृपमध्ये शेअर्स खरेदी-विक्री आणि शेअर मार्केटसंबंधी माहिती दिली जात होती. पवित्रा वर्मा, रोहन शहा आणि मिया विल्सन शहा यांसारख्या व्यक्तींनी विशिष्ट स्टॉक्समध्ये गुंतवणूक केल्यास 10 ते 15 टक्के चांगला नफा मिळवून देण्याची हमी दिली.
आरोपींनी फिर्यादीला एक ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. सुरुवातीला फिर्यादीचा विश्वास जिंकण्यासाठी त्यांनी केलेल्या लहान गुंतवणुकीवर मोठा नफा दाखवला आणि तो फिर्यादीच्या बँक खात्यात जमाही केला. यामुळे फिर्यादीचा विश्वास बसला. या विश्वासाच्या आधारावर, तक्रारदार यांनी आरोपींनी दिलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण 2 कोटी 24 लाख 59 हजार 999 एवढी मोठी रक्कम गुंतवली.
ॲप्लिकेशनमध्ये त्यांना तब्बल 10 कोटी रुपयांपर्यंत मुद्दल आणि नफा दाखवण्यात आला. मात्र, जेव्हा फिर्यादीने आपली गुंतवलेली रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपींनी त्यांना वेगवेगळे ’चार्जेस’ सांगायला सुरुवात केली. यामुळे फिर्यादीला फसवणूक झाल्याचा संशय आला आणि त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना, फसवणुकीच्या रकमेपैकी एक कोटी पाच लाख रुपये ही रक्कम ॲक्सिस बँकेच्या अकाउंटवर जमा झाल्याचे उघड झाले. हे बँक खाते जन सेवा इंडस्ट्रीज लिमिटेड या नावाने होते आणि ते संतोष सदाशिव रुपनर यांचे असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस उप निरीक्षक प्रकाश कातकाडे आणि त्यांच्या स्टाफने तांत्रिक विश्लेषण करून स्वारगेट पोलिसांच्या मदतीने संतोष रुपनर याचा शोध घेतला. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर, त्याचा सक्रिय सहभाग सिद्ध झाल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.
आरोपीने गुन्ह्यात वापरलेल्या ॲक्सिस बँक खात्यातून एकूण 3 कोटी 53 लाख 87 हजार 935 रुपयांचा व्यवहार झाला आहे. या बँक खात्याविरोधात देशातील विविध राज्यांतून फसवणुकीच्या एकूण 12 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे करीत आहेत.
..यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस आयुक्त विनायक कुमार चौबे, सह पोलिस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलिस उपायुक्त डॉ शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलिस उपनिरीक्षक वैभव पाटील, सागर पोमण, रोहित डोळस, प्रकाश कातकाडे, विद्या पाटील, पोलिस कॉन्स्टेबल दीपक भोसले, विनायक म्हस्कर, हेमंत खरात, ज्योती साळे, अतुल लोखंडे, माधव आरोटे, सोपान बोधवड, संतोष सपकाळ, दीपाली चव्हाण यांच्या पथकाने केली.