

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या ‘ज्येष्ठानुबंध’ या मोबाईल अॅपवर दररोज सरासरी दोन ते तीन वृद्धांकडून मदतीसाठी विनंत्या प्राप्त होत असून, पोलिसांकडून त्यावर तात्काळ प्रतिसाद दिला जात आहे. या अॅपचा उद्देश वयोवृद्ध नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरजांकरिता मदत उपलब्ध करून देणे आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चिखली येथे करण्यात आले. ‘ज्येष्ठांचा सन्मान, पोलिसांचा मान’ या संकल्पनेतून अॅपची निर्मिती करण्यात आली असून, औषध खरेदी, किराणा, दवाखान्यात ने-आण किंवा फक्त संवादासाठीही या अॅपच्या माध्यमातून मदत मागता येते. (Pimpari Chinchwad News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अॅपवर सध्या 25 हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये दररोज दोन ते तीन वृद्धांनी सरकारी योजनांची माहिती, मुलांचा सुनेचा त्रास, औषधे आणणे, हॉस्पिटलमध्ये सोबत जाणे, किंवा तत्सम मदतीसाठी विनंती केली असून, स्थानिक पोलिस ठाण्यांमार्फत त्यावर तात्काळ कृती करण्यात आल्याची नोंद आहे.
ज्येष्ठानुबंध अॅपमध्ये रुग्णालयांची माहिती, अॅम्ब्युलन्स सेवा, आणि आपत्कालीन संपर्क क्रमांकांचा समावेश आहे. अॅपमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून, नागरिकांच्या विनंत्यांचे विश्लेषण करणे आणि तात्काळ सेवा पुरवणे शक्य होत आहे.
या उपक्रमासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात स्वतंत्र नियंत्रणकक्ष स्थापन करण्यात आला आहे. येथे नियुक्त करण्यात आलेले अधिकारी आणि कर्मचारी हे ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी, गरजा व विनंत्यांवर तातडीने प्रतिसाद देत असल्याचे दिसून येत आहे. वरिष्ठ अधिकार्यांकडून या कक्षाच्या कामकाजावर नियमितपणे देखरेख ठेवली जाते.
पिंपरी-चिंचवड परिसरात अनेक नागरिकांच्या मुला-मुली उच्चशिक्षण, नोकरी वा व्यवसायासाठी इतर शहरात, परदेशात स्थायिक असल्याने त्यांच्या वृद्ध पालकांना रोजच्या गरजांसाठी अडचणींना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम सुरू करण्यात आला असून, ही सेवा 24 तास विनामूल्य उपलब्ध आहे.
मुलगा दारू पिऊन आला आहे
माझा मुलगा रोज रात्री उशिरा दारू पिऊन घरी येतो. आज तो आरडाओरडा करत आहे, सामान फेकून देतोय. मी आणि माझी पत्नी खूप घाबरलो आहोत. कृपया पोलिसांनी यावे आणि परिस्थिती नियंत्रणात आणावी. आम्ही दोघं वृद्ध आहोत. ज्येष्ठ नागरिक, काळेवाडी
सून मानसिक त्रास देत आहे
माझी सून दिवसभर माझ्याशी बोलत नाही. मुद्दाम जेवण वेळेवर देत नाही, अपमानास्पद बोलते. शरीर साथ देत नाही आणि मानसिक त्रास वाढतोय. घरात दुसरे कोणीही नाही. कृपया पोलिसांनी समुपदेशन किंवा मदत करावी. ज्येष्ठ नागरिक, चिंचवड
कॅबचालकाने जास्त पैसे मागितले
आज दवाखान्यातून घरी येताना कॅबने सांगितल्यापेक्षा दुहेरी भाडे मागितले. मी वृद्ध असून वाद घालू शकत नाही. पैसे देऊनही अपमानित वाटले. कृपया अशा चालकांवर कारवाई व्हावी.
ज्येष्ठ नागरिक, वाकड
ज्येष्ठानुबंध अॅपच्या माध्यमातून दररोज दोन ते तीन ज्येष्ठ नागरिक आमच्याशी संपर्क साधतात. आमचे पथक तत्काळ त्यांच्या मदतीसाठी पोहोचत आहे. ही सेवा सुरू केल्यापासून अनेक वृद्ध नागरिकांना वेळेवर मदत मिळाली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन सुरू केलेली ही सेवा त्यांच्या आयुष्यात दिलासा निर्माण करत आहे, ही अत्यंत समाधानकारक बाब आहे.
विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड.