Lonavala BJP Rift: लोणावळा शहर भाजपामध्ये दुफळी; वरिष्ठांकडून दोन्ही गटांना सबुरीचा सल्ला

महाराष्ट्रामध्ये झालेली विधानसभा निवडणूक ही महायुती व महाविकास आघाडी अशी लढवली गेली.
BJP
लोणावळा शहर भाजपामध्ये दुफळी; वरिष्ठांकडून दोन्ही गटांना सबुरीचा सल्ला File Photo
Published on
Updated on

विशाल विकारी

लोणावळा: मागील दोन वर्षांपासून लोणावळा शहर भाजपामध्ये सुरू असलेली धुसफूस नगर परिषद निवडणुका जस जशा जवळ येऊ लागल्या, तशी प्रखरतेने पुढे येऊ लागली आहे. त्यामुळे लोणावळा शहर भाजपामध्ये एक पक्ष व दोन गट स्पष्टपणे दिसू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये एक दिलाने काम करणारी भाजपा विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र दोन गटांत विभागली गेली.

महाराष्ट्रामध्ये झालेली विधानसभा निवडणूक ही महायुती व महाविकास आघाडी अशी लढवली गेली. मावळ तालुका मात्र याला अपवाद ठरला. महायुतीमधील मोठा घटकपक्ष असलेल्या भाजपाने राष्ट्रवादीचे उमेदवार व आमदार सुनील शेळके यांना विरोध दर्शवत अपक्ष उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला.  (Latest Pimpri News)

BJP
Smart Meter Bill Issue: स्मार्ट मीटरमुळे वाढीव बिलाचा शॉक

याच कारणामुळे शहर भाजपामध्येदेखील दोन गट पडले. राज्यस्तरावर महायुती असल्याने व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी महायुतीचे काम करण्याचे आदेश व सूचना कार्यकर्त्यांना दिल्याने शहरामधील एका गटाने पक्षादेश मानत महायुतीला म्हणजेच आमदार शेळके यांना जाहीर पाठिंबा दिला. तर सुरुवातीला आमदार शेळके यांना पाठिंबा देणार्‍या दुसर्‍या गटाने ऐनवेळेस मावळ तालुक्यातील नेते मंडळींच्या सूचनांचा आदर करत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला.

प्रचारादरम्यान देखील हे दोन्ही गट एकमेकांच्या आमने-सामने आले. विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार शेळके यांना मोठे यश प्राप्त झाले. शहरामधून सर्वाधिक आघाडी आमदार शेळके यांना मिळाली. या यशाचे शिल्पकार म्हणून शहरातील भाजपच्या गटाला आमदार शेळके यांनी ताकद दिली.

वरिष्ठांकडून हस्तक्षेप

लोणावळा शहर भाजपामध्ये माजी नगराध्यक्षा जाधव व माजी उपनगराध्यक्ष पुजारी यांना मानणारा एक गट व भाजपाचे सभागृहातील गटनेते देविदास कडू, माजी शहराध्यक्ष अरुण लाड यांना मानणारा दुसरा गट असे उघड उघड दोन गट पडले आहेत.

एकमेकांवर ताशेरे ओढण्याची संधी हे गट सोडत नसल्यामुळे भाजपामध्ये मोठी दुफळी लोणावळा शहरामध्ये निर्माण झाली आहे. सदरची दुफळी दूर करत दोन्ही गटांना एकत्र आणण्यासाठी मावळ तालुक्यातील वरिष्ठ पदाधिकारी यांनी हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे.

दोन्ही गटांच्या स्वतंत्र बैठका घेत त्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. येणार्‍या नगरपरिषदा, नगरपंचायती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुतीच्या माध्यमातून लढविण्याबाबत राज्य पातळीवर एक मत झाले आहे. मावळात मात्र विधानसभेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.

मावळ तालुक्यामध्ये आमदार शेळके यांना मानणारा मोठा वर्ग असून त्यांच्याच नेतृत्वाखाली मावळ तालुक्यातील सर्व निवडणुका होणार आहेत. लोणावळा शहरावर देखील त्यांची मोठी पकड असल्याने त्यांच्याच नेतृत्वाखाली लोणावळा शहरांमधील नगरपरिषदेची निवडणूक होणार आहे.

BJP
PCMC Tender Scam: सहा कोटींचे कॉम्पॅक्टर रॅक खरेदी दहा कोटींवर; महापालिका भांडारचा अजब कारभार

गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने भाजपमधील गटबाजी पुन्हा एकदा दिसून आली आहे. त्यामुळे मावळ तालुक्यातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करत असले तरी त्यांच्या प्रयत्नांना कितपत यश मिळेल हे येणारा काळच सांगणार आहे. तूर्तास तरी दोन्ही गटांमधील वाद शमण्याची चिन्हे कमी असल्याचे चित्र दिसून येत आहे.

नगराध्यक्षांनी विश्वासात घेतले नाही

मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये 2016 ते 2021 या कालावधीमध्ये नगर परिषदेमध्ये एकत्र कामकाज केलेले नगरसेवक व नगराध्यक्ष यांनी आता मात्र झालेल्या कामांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. नगरसेवकांनी नगराध्यक्ष कामकाज करत असताना आम्हाला विश्वासात न घेता त्यांनी पंचवार्षिक टर्म पूर्ण केली असे आरोप त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसणारे भाजपाचे नगरसेवक करू लागले आहेत. त्यामुळे सत्ताधारी गटात असताना सत्तेचे लोणी खाणारे आता भाजपाला घरचा आहेर देत आहेत.

आमच्या पाठिंब्यामुळेच विकासकामे

मागील पंचवार्षिकमध्ये जनतेमधून नगराध्यक्ष निवडून आलेल्या सुरेखा जाधव व उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये मोठ्या प्रमाणात कामे शहरामध्ये केलेली आहेत. मात्र, ही कामे होत असताना आम्हीदेखील त्यांच्यासोबत होतो, आमचादेखील त्यांना पाठिंबा होता म्हणूनच त्या ही कामे करू शकले, असे भाजपाचे सभागृहातील गटनेते देविदास कडू यांनी रोखठोकपणे सांगितले आहे. तसेच भाजपाच्या इतर नगरसेवकांनीदेखील आम्ही त्यांना साथ दिली मात्र त्यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही. आमच्या प्रभागात कामे होत असताना आम्हाला जाणीवपूर्वक डावलले जात होते, असे आरोप भाजपाचेच माजी नगरसेवक करत आहेत.

पक्ष संघटनेपेक्षा स्वत:ला मोठे समजणे

लोणावळा भाजपाचे माजी शहराध्यक्ष अरुण लाड यांनीदेखील दुसर्‍या गटावर निशाणा साधताना पक्ष संघटनेला विश्वासात घेतले जात नव्हते. मी शहर अध्यक्ष असताना सूचनांचे व आदेशाचे पालन होत नव्हते, काही लोक पक्षापेक्षा स्वतःला मोठे समजतात व ते म्हणतील तीच दिशा असे धोरण राबवले जात असल्यामुळे बहुतांश भाजपाला मानणारा वर्ग सध्या नाराज असल्याचे त्यांनी एका पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सांगितले आहे. नुकतीच झालेली मंडल अध्यक्ष पदाची निवडणूक त्याचे मूर्तिमंत उदाहरण असल्याचे इतर माजी पदाधिकारी सांगत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news