

पिंपरी: स्थानिक उद्योजकांच्या समस्या सुटाव्यात, या उद्देशाने संवाद वाढवून त्यांना अधिक चांगल्या प्रकारे सुविधा देण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला होता. त्यासाठी उद्योग सुविधा कक्ष सुरू केला. मात्र, चार महिने उलटूनही अद्याप उद्योजकांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. त्यामुळे तक्रारी, विनंती, निवेदन देण्याची वेळ आली आहे. आत्तापर्यंत 22 तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी अनेक तक्रारी तशाच पडून आहेत.
औद्योगिक आणि आर्थिक गुंतवणुकीला चालना मिळावे, हा उद्देश समोर ठेवून मार्च महिन्यात महापालिकेत उद्योग सुविधा कक्ष सुरू करण्यात आला होता. भोसरी एमआयडीसीत मुख्य सत्यासह अंतर्गत असे 76 किलोमीटर रस्त्याचे जाळे आहे. (Latest Pimpri News)
लघू, सूक्ष्म व मध्यम उद्योजकांची मोठी संख्या आहे. दररोज लाखो कामगार काम करतात. औद्योगिक गुंतवणुकीस अनुकूल वातावरण निर्माण करणे, व्यापारी, उद्योजक व कामगार संघटनांशी संवाद साधून स्थानिक पातळीवरील अडचणी समजून घेण्यासाठी हा कक्ष काम करतो.
समस्या निवारणासाठी उद्योग प्रतिनिधी आणि क्षेत्रीय अधिकार्यांमध्ये दरमहा बैठक घेण्याचे ठरले आहे. आयुक्त स्तरावर त्रैमासिक बैठक होणार आहे. त्यात एमआयडीसी, पोलिस प्रशासन आणि राज्य शासनाशी समन्वय साधून धोरणात्मक चर्चा केली जाणार होती. मात्र. चार महिने उलटूनही समस्या सुटली नसल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.
या आहेत समस्या
वीज, पाणीच्या तक्रारी वाढल्या
कचरा कित्येक दिवस कंपनीबाहेर तसाच पडून
अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, पदपथ नाहीच
ईटीपी (सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) केवळ चर्चाच
पथदिवेअभावी अंधारात कामगारांची लूटमार
औद्योगिक गाळ्यांचे वाटपास विलंब
पीएमपी बसथांब्याची अपुरी संख्या
चौकाचौकात वाहतूककोंडी
पार्किंग, बेशिस्त वाहतुकीचे अधिक प्रमाण
उद्योजकांना भेडसावत असलेल्या समस्या वेळोवेळी मांडत आलो. चर्चेनंतर ठोस कार्यवाही अपेक्षित आहे. महिलांची सुरक्षा, पीएमपी बसथांबे, पथदिवे, औद्योगिक गाळे वाटप अशा समस्या सुटेपर्यंत आम्ही पाठपुरावा सुरू ठेवणार आहोत.
- एक उद्योजक