Unauthorized flex hoarding
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृतपणे लावले जाणारे होर्डिंग, फ्लेक्स, पोस्टर्स, बॅनर, किऑस्क यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. अशा पद्धतीने अनधिकृतपणे फलक लावणार्यांवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. तसेच, दंडात्मक कारवाई केली जाईल. असा इशारा महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त राजेश आगळे यांनी दिला आहे.
यापूर्वीही महापालिकेने 6 फेब्रुवारी 2024 रोजी अशीच कार्यवाही करून शहरातील मोठ्या प्रमाणावरील अवैध फलक हटवले होते. त्यानंतरही अनेक ठिकाणी अनधिकृत जाहिराती पुन्हा दिसू लागल्याने महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने याबाबत पुन्हा कठोर भूमिका घेतली आहे. (Latest Pimpri News)
शहरात कोणतीही व्यक्ती, संस्था, व्यापारी, उद्योजक, राजकीय कार्यकर्ते यांनी शहरामध्ये महापालिकेची पूर्वपरवानगी न घेता जाहिरात होर्डिंग, फलक, पोस्टर्स, किऑक्स, बॅनर्स किंवा फ्लेक्स लावल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व शासनाच्या परिपत्रकानुसार कार्यवाही केली जात आहे.
शहरातील सार्वजनिक ठिकाणी लग्न, वाढदिवस, स्वागत, निवडणूक, धार्मिक व अन्य कार्यक्रमांचे फ्लेक्स व फलक लावले जातात. यामुळे केवळ शहर विद्रुप होते. वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अशा प्रकारच्या फ्लेक्स, होर्डिंग, किऑक्स व फलकांवर क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकांकडून कारवाई केली जात आहे. त्याबाबत सर्व राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी व शहराध्यक्षांनाही सूचित करण्यात आले आहे.
अधिकृत होर्डिंगवर जाहिरात लावावी
सर्व नागरिक, संस्था, व्यापारी, उद्योजक व राजकीय पक्षांना शहरातील कोणत्याही भागात अनधिकृत होर्डिंग, फलक, पोस्टर्स, बॅनर, फ्लेक्स किंवा किऑस्क लावू नयेत. याप्रकरणी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. महापालिकेने परवानगी दिलेल्या अधिकृत होर्डिंगवर जाहिरात लावावी, असे महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त राजेश आगळे यांनी सांगितले.