

पिंपरी: मावळ परिसरात पाऊस कायम आहे. त्यामुळे पवना धरणातील पाणीसाठा वाढला आहे. धरणात शनिवारी (दि.2) सायंकाळपर्यंत 94 टक्के जलसाठा झाला होता. येत्या दोन ते तीन दिवसांत धरण 100 टक्के भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरवासीयांसह मावळ तालुक्यातील नागरिक तसेच, शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणी मिळते. मावळ्यातील धरण परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. त्या भागांतील डोंगरातून पाणी वाहत आहे. ओढे, नाले, धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. ते पाणी धरण क्षेत्रात जमा होत आहे. परिणामी, जलाशयात झपाट्याने वाढत आहे. धरणात शनिवारी सायंकाळपर्यंत 94 टक्के पाणीसाठा झाला होता. (Latest Pimpri News)
आज दिवसभरात एकूण 88 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण 448 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. दिवसभरात 2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. एक जूनपासून आत्तापर्यंत एकूण 1799 मिलिमीटर पाऊस झाला आहे. पाणी वाढल्याने पवना नदी दुथडी भरून वाहत आहे. तसेच, मुळा व इंद्रायणी नदीही भरून वाहत आहे.
आंद्रा धरण 100 टक्के भरले
मावळ तालुक्यातील आंद्रा धरणात 100 टक्के भरले आहे. आज दिवसभरात 2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आत्तापर्यंत एकूण 987 मिलिमीटर पाऊस पडला आहे. तर, खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणाचा पाणीसाठा 88 टक्क्यांवर पोहचला आहे. मुळशी धरणात 87 टक्के पाणीसाठा आहे.
जलपूजन कोण करणार?
पवना धरण 100 टक्के भरण्याच्या वाटेवर आहे. धरण पूर्ण भरल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरांकडून पवना धरणावर जाऊन जलपूजन करण्याची परंपरा आहे; मात्र महापालिका बरखास्त झाल्याने गेल्या सव्वातीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे जलपूजनांची परंपरा खंडित झाली आहे. त्यामुळे यंदा कोण जलपूजन करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.