Drug Free India Mission: पुढील ३ ते ४ वर्षांत देश अमली पदार्थमुक्त करण्याचा निर्धार; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

तरुणाईला व्यसनाधीन करण्याचे छुपे युद्ध सुरू असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा; ड्रग्जविरोधी कारवाईसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार
Drug Free India Mission
Drug Free India MissionPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: भारताची वाढती ताकद आणि प्रगती सहन न होणाऱ्या काही देशांनी थेट युद्धाऐवजी अमली पदार्थांच्या माध्यमातून भारताविरोधात छुपे युद्ध सुरू केले आहे. देशातील तरुणाईला व्यसनाधीन करून भावी पिढी कमकुवत करण्याचे हे षडयंत्र आहे. या गंभीर आव्हानाचा सामना करण्यासाठी पुढील तीन ते चार वर्षांत देश अमली पदार्थमुक्त करण्याचा निर्धार शासनाने केला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या लढ्यात प्रत्येक नागरिकाने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Drug Free India Mission
Lonavala Drug Racket: लोणावळ्यात एमडी ड्रग्स आणि गांजाचा विळखा; तरुणाईच्या व्यसनाधीनतेने चिंता वाढली

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन, भूमिपूजन आणि लोकार्पण मंगळवारी (दि. ३) मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानिमित्त आकुर्डीतील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, गृह राज्यमंत्री योगेश कदम, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, महापौर रवी लांडगे, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, आमदार उमा खापरे, विक्रम काकडे, शंकर जगताप, सुनील शेळके, सुनील कांबळे, महेश लांडगे, शरद सोनवणे, बापूसाहेब पठारे, चेतन तुपे, बाबाजी काळे, पोलिस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Drug Free India Mission
Children Safety On Two Wheelers: मुलांचे लाड करताना जीवाशी खेळ नको! दुचाकीवर उलटे बसवणे ठरू शकते धोकादायक

मुख्यमंत्री म्हणाले की, देशाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तरुणाईला व्यसनाधीनतेपासून वाचविणे आवश्यक आहे. त्यासाठी अमली पदार्थांची निर्मिती रोखणे, वितरण साखळी उद्ध्वस्त करणे, व्यसनाधीनांवर उपचार आणि जनजागृती अशा विविध पातळ्यांवर शासन काम करीत आहे. पालकांनीही मुलांच्या वर्तनातील बदल ओळखून वेळीच समुपदेशन आणि उपचार करावेत. प्रत्येकाने आपले घर, परिसर, गाव आणि महाराष्ट्र अमली पदार्थमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा.

पुढील पंधरा वर्षांत पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या पुण्यापेक्षाही अधिक असेल. वाढते शहरीकरण आणि बदलत्या गुन्हेगारीचा सामना करण्यासाठी पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा. सीसीटीव्ही, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे गुन्ह्यांचा तपास अधिक वेगवान आणि प्रभावी होणार आहे. एआय आधारित 'तपास सारथी' प्रणालीमुळे तपासापासून आरोपपत्रापर्यंतची प्रक्रिया सुलभ होईल. बॉडी-वॉर्न कॅमेऱ्यांमुळे पोलिसांच्या सुरक्षिततेत भर पडेल, असेही त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवडसाठी उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक पोलिस आयुक्तालयाच्या आराखड्यात दिवंगत अजित पवार यांनी स्वतः लक्ष घातले होते. ही इमारत पूर्ण झाल्यानंतर देशातील सर्वाधिक आधुनिक पोलिस आयुक्तालय म्हणून तिची ओळख निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

Drug Free India Mission
Pimpri Chinchwad Municipal Corporation Loan: पिंपरी-चिंचवड महापालिका १,२४६ कोटींचे कर्ज उभारणार; विकासकामांसाठी मोठी आर्थिक तरतूद

पोलिस मुख्यालयासाठी ५० एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, कर्मचाऱ्यांसाठी सर्व सुविधांनीयुक्त निवासस्थाने उभारण्यात येणार आहेत. प्रास्ताविकात पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आयुक्तालयाची कामगिरी आणि आधुनिक सुविधांची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांसह ऑनलाइन सहभागी शालेय विद्यार्थ्यांना अमली पदार्थविरोधी शपथ दिली. दरम्यान, 'दिशा' उपक्रमातील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.

खाकीच्या संवेदनशीलतेचे कौतुक

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन देऊन एक कोटी रुपयांचा निधी उभारला. हा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करीत शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असल्याची ग्वाही दिली.

दिशाहीन युवा विनाशकारी

'युवा' हा शब्द उलटा केल्यास 'वायू' होतो. हाच वायू चक्रीवादळाचे रूप धारण करतो, तेव्हा समाज उद्ध्वस्त करतो; मात्र तोच वायू प्राणवायू बनतो, तेव्हा जीवनाला आधार देतो. तरुणाईचेही असेच आहे. दिशाहीन झालेला युवक समाजासाठी घातक ठरू शकतो; मात्र त्याच युवकाला योग्य दिशा दिल्यास तो समाजाच्या प्रगतीचा प्राणवायू बनतो. त्यामुळे युवा पिढीला योग्य दिशा देणे ही काळाची गरज आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा संदर्भ देत सांगितले.

Drug Free India Mission
Pimpri Chinchwad Police: डायल ११२ प्रतिसादात पिंपरी-चिंचवड पोलिस राज्यात अव्वल; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

पोलिस दलाला आधुनिक साधनसामग्री

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ताथवडे येथील पोलिस मुख्यालयाच्या जागेच्या सातबारा उताऱ्याचे हस्तांतरण करण्यात आले. पिंपरी पोलिस ठाणे, परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त कार्यालय, अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सचे विभागीय कार्यालय आणि २०० शासकीय निवासस्थाने असलेल्या पोलिस संकुल कामाचे भूमिपूजन झाले. सीसीटीव्ही आणि एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणालीचा यावेळी प्रारंभ करण्यात आला. तसेच ३५० बॉडी-वॉर्न कॅमेरे, चार ड्रोन आणि ६५ नवीन पोलिस वाहनांचे लोकार्पण झाले.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या पोलिसांना अत्याधुनिक सुविधा आणि हक्काची घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांचे उपक्रम गुन्हे नियंत्रण आणि वाहतूक नियमनासाठी उपयुक्त ठरतील. पोलिसांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी शासन खंबीरपणे पाठीशी राहील. पिंपरी- चिंचवड शहराच्या विकासात दिवंगत अजित पवार यांचे मोलाचे योगदान आहे.

एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

दिवंगत अजित पवार यांनी पोलिस आयुक्तालयाच्या इमारतीसाठी १८० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन चिखलीतील नवीन आयुक्तालय, पिंपरी पोलिस संकुल, आळंदी पोलिस ठाणे, वाकड येथील अपर पोलिस आयुक्त कार्यालय, अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स, वाहतूक आणि सायबर कार्यालयांचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. 'ज्येष्ठानुबंध' आणि 'दिशा' उपक्रमांमुळे ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना आधार मिळणार आहे.

सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.