

पिंपरी: ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्री दिन साजरा केला जातो. या वर्षी शालेय विद्यार्थी व तरुणाईमध्ये फ्रेंडशीप डे साजरा करण्याचा विशेष उत्साह दिसून येतो. फ्रेंडशीप बँड बांधून मैत्री अबाधित ठेवण्याबरोबरच ती अतुट राहील, असा विश्वासही यानिमित्त व्यक्त केला जातो. यानिमित्त फ्रेंडशीप बँडचे आकर्षक विविध प्रकार बाजारात उपलब्ध असून, खरेदीसाठी तरुणाईची गर्दी होत आहे.
बाजारात अवघ्या दहापासून ते 500 रुपयांपर्यंत विविध प्रकारचे बँड सध्या उपलब्ध आहेत. रेशमी, कापडी, रबर, प्लास्टिकचे, शुभेच्छा लिहिलेले रबरी बँड, चौकोनी व गोल मण्यामधील बँड, ब्रेसलेटचे आकार असलेले असे विविध प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. याची खरेदी करताना तरुण-तरुणी दिसत आहेत.(Latest Pimpri News)
मणी, रंगबेरंगी धाग्यांचा फ्रेंडशीप बँड
मणी आणि रंगबेरंगी धाग्यापासून बनविलेले फ्रेंडशीप बँड हे डझनावर उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्व मित्र - मैत्रिणांना एकसारखा पर्याय म्हणून हे बँड खरेदी करण्याकडे तरुणाईचा कल असतो.
ब्रेसलेटसारखे बँड
हे बँड कुंदन, मणी आणि स्टोन वापरून तयार केलेले आहेत. त्यामुळे दिसायला सुंदर आणि आकर्षक दिसतात. हे बँड इतरही दिवशी फक्त ब्रेसलेट म्हणूनही वापरता येतात.मेटलचे बँडहे बँड यामध्ये मेटलचा वापर करून एखाद्या बांगडीप्रमाणे किंवा कड्याप्रमाणे दिसणार्या बँडची किंमत 50 रुपयांपासून पुढे आहे.
लेदरचे बँड
लेदर आणि दोरा वापरून बनविलेले हे बँड खूपच खास आणि रिच लूक देतात. हे अॅडजेस्टेबल असतात. त्यामुळे त्याला कमी किंवा जास्त करण्याचा पर्यास असतो. हेदेखील बँड इतरही दिवशी वापरता येतात.
रिबन बँड अन् अंगठी
रिबन बँड आणि अंगठी हे बँड खूप वर्षांपासून चालत आलेले आहेत. याला सध्या मागणी कमी असली तरी बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत. शालेय विद्यार्थ्यांची यामध्ये खूप चलती आहे.