

पिंपरी: भाऊ बहिणीच्या प्रेमाची साक्ष देणारा रक्षाबंधन हा सण काही दिवसांवर आला आहे. पिंपरी-चिंचवडच्या बाजारपेठांमध्ये राखीखरेदीला वेग आल्याचे चित्र दिसत आहे. सुरेख डिझायनर, पारंपरिक, लाईटिंग व म्युझिकल राख्यांची क्रेझ बाजारात पाहायला मिळते आहे.
गेल्या काही वर्षांपासून पारंपरिक मोठ्या आकारातील राख्यांसह लहान नाजूक आखीवरेखीव राख्यांना अधिक मागणी आली आहे. त्यामुळे दरवर्षी काहीतरी नावीन्य या ऱाख्यांमध्ये आल्याचे पाहायला मिळते. यंदा अमेरिकन डायमंडसह, वुलन, लाकडी राखी, चांदीची, सोनेरी, थ्रेडवर्क असे विविध राख्यांचे प्रकार पाहायला मिळताहेत. (Latest Pimpri News)
आपला प्रिय भाऊ जर बाहेरगावी राहात असेल तर त्याला देण्यासाठी राखीसह राखीचे ताट असा सेटही बाजारात भाव खाऊन जात आहे. दरवर्षीपेक्षा महागाईचा परिणाम झाल्याचे चित्र असल्यामुळे राख्यांच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. बाजारपेठेत दोन रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत वैविध्यपूर्ण राख्यांचे कलेक्शन आले आहे. आपल्याला हव्या त्या आकारात, रंगात असल्यामुळे खूप ऑप्शन आहेत.
लाईटिंग व म्युझिकल राखी
बच्चे कंपनीसाठी मिनीयन, मोटू पतलू, छोटा भीम, अँग्री बर्ड, बाल गणेश, डोरेमॉन, शिनचॅन या कार्टून्सच्या राख्याही बाजारात आल्या आहेत. यामध्ये खास करून लाईटिंग व म्युझिकल राखीही मिळते. लहानग्यांसाठी कार्टूनराखी उत्तम पर्याय आहे. तसेच लहान मुलांना गिफ्ट देण्यासाठी काटूर्र्न राखीसह त्या कार्टूनचे मास्क असा एक गिफ्टचा चांगला ऑप्शन आहे. यात मिनीयनला पसंती आहे.
लुम्बा राखीमध्ये बँगल प्रकार
मारवाडी किंवा गुजराती समाजात नणंद भावजईला राखी बांधली जाते ती लुम्बा राखी. या राखीमध्ये तर पाहिजे तितके प्रकार आपल्याला मिळतील. आता केवळ फॅशन म्हणूनही मुली वापरतात, त्यामुळे लुम्बालाही बाजारात मागणी वाढली आहे. या राख्या खासकरून लटकन या प्रकारातील असतात. यात बांगडी पॅटर्न देखील आहे. त्याला महिलांची चांगली मागणी आहे. यात मणी, क्रिस्टल यांचा सुरेखरित्या वापर केला जातो. तसेच लोकरीचादेखील आकर्षकरित्या वापर केलेला पाहायला मिळतो.
बाहेरगावी पाठवण्यासाठी खास राखी पॅकेट
भावाला पोस्टाने राखी पाठवण्यासाठी खास सोय म्हणून आकर्षक ताटासह हळदी-कुंकू, अक्षदा,राखी असा सेट सध्या बाजारात विकत मिळतोय. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर असा सेट तुमच्या भावाकरिता पाठवला तर वेळेत पोहोचेल यात शंका नाही. या सेटच्या किमतीत राखीनुसार विविधता आहे.
घड्याळ राखी
यंदा घड्याळ असलेली नवीन राखी बाजारात आली आहे. ही राखी 180 रुपयांच्या पुढे आहे. घड्याळ आणि मण्यांचा बेल्ट असलेल्या राखीला ग्राहकांची पसंती आहे. यामध्ये विविध रंगदेखील उपलब्ध आहेत. ही राखी इतर दिवशीही वापरता येण्यासारखी आहे.