Pimpri News: तुम्ही बेरोजगार असून ऑनलाईन नोकरी शोधत असाल, तर जरा सावध व्हा..! कारण मागील दहा महिन्यांत सायबर चोरट्यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे एक हजार जणांची फसवणूक केली आहे. याबाबत सायबर विभागाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
अशी आहे मोडस
ऑनलाईन नोकरी सर्च केल्यानंतर हॅकर्स मोबाईलवर संपर्क करतात. वेबसाईट्सवर घरबसल्या काम उपलब्ध करून देण्याचे आमिष देऊन व्हिडिओ लाईक करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा किंवा इन्स्टाग्राम पोस्ट लाईक करा, अशी सोपी काम देतात. याच्या बदल्यात लाखो रुपये मिळवून देणार असल्याचे सांगतात.
बेरोजगारांनी संपर्क केल्यानंतर सुरुवातीला काही रक्कम देऊन त्यांचा विश्वास संपादित केला जातो. त्यानंतर काही रक्कम गुंतवण्यास सांगून अधिक नफा मिळवून देण्याचे खोटे सांगितले जाते. एकदा कार्यक्रम गुंतवली की हॅकर्स काहीही प्रतिसाद देत नाहीत. त्या वेळी आपली फसवणूक झाल्याचे बेरोजगार मंडळींच्या लक्षात येते. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो.
निवृत्त कर्मचारी गृहिणी आणि बेरोजगार तरुण टार्गेट
ऑनलाईन नोकरी सर्च केल्यानंतर आपली इत्यंभूत माहिती हॅकर्सच्या हाती लागते. संबंधित माहितीच्या आधारे सायबर चोरटे निवृत्त कर्मचारी, गृहिणी, बेरोजगार तरुण यांना संपर्क करतात. यापूर्वीच्या गुन्ह्यात बळी पडलेल्यांमध्ये यांची संख्या जास्त असल्याचे सायबर विभागाकडून सांगण्यात येत आहे.
घर बैठे पैसे कमाईए..!
गुगल किंवा मेटा अशा प्लॅटफॉर्मचा वापर करून हे हॅकर्स गरजू नागरिकांना हेरतात. ‘घर बैठे नोकरी करें, घर बैठे पैसे कमाईए’ अशा प्रकारचे कीवर्ड्स वापरले जातात. सोशल मीडियावर अशा प्रकारच्या जाहिराती देऊन हॅकर्स मोठ्या प्रकारे फसवणूक करत आहेत.
साईट्स ब्लॉक करूनही फसवणूक सुरूच
केंद्रीय गृह मंत्रालयाने नोकरीसंदर्भात फसवणूक करणार्या 100 च्या पुढे वेबसाईट्स आत्तापर्यंत ब्लॉक केल्या आहेत. सोशल मीडिया, टेक्स्ट मेसेज, व्हॉट्सअॅप किंवा इतर माध्यमातून या वेबसाईट्स फसणूक करत असल्याचे त्या वेळी स्पष्ट करण्यात आले होते. या वेबसाईटवर बंद झाल्या असल्या तरीही हॅकर्स वेगवेगळ्या वेबसाईटवरील डेटा चोरून फसवणूक करत आहेत.
फसवणूक टाळण्यासाठी हे करा
यूट्यूब व्हिडिओ किंवा इन्स्टाग्राम पोस्ट लाईक करणे ही नोकरी नसते. यासाठी कोणी पैसे देत नाही हे लक्षात घ्या.
व्हॉट्स अॅप, एसएमएस किंवा इतर ठिकाणी आलेल्या अनोळखी किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका.
अशा प्रकारचे हॅकर्स शक्यतो विदेशी खोट्या नावांनी मेसेज करतात. अनोळखी नावांनी आलेल्या लिंकवर क्लिक करू नका.
बँक खात्यासह गोपनीय माहिती शेअर करू नका
सुरुवातीला मिळालेले पैसे हे केवळ विश्वास संपादन करण्यासाठी हॅकर्सने केलेली गुंतवणूक असते.
कोणत्याही प्रकारे फसवणूक झाल्यास किंवा तसा संशय आल्यास नॅशनल सायबरक्राईम रिपोर्टिंग पोर्टल (छउठझ) या वेबसाईटवर तक्रार नोंदवा.
ऑनलाईन नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. बेरोजगार तरुण यामध्ये जास्त बळी पडत आहेत. सायबर विभाग मोठ्या प्रमाणात जनजागृती करत आहे. पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन केल्यास फसवणूक टाळणे शक्य होईल.
- प्रवीण स्वामी, सहायक निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे.