Pimpri Politics: पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात 18 ते 100 वयोगटांतील मतदार आहेत. त्यातील तरुण व प्रौढ मतदारांची संख्या अधिक आहे. नव्या पिढीतील युवा मतदारांचा कौल शहरासाठी तीन नवे आमदार ठरविण्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
निवडणूक विभागाकडून नवमतदारांची नोंदणी केली जाते. त्यासाठी महाविद्यालयात जनजागृती मोहिमा घेतल्या जातात. त्यामुळे नवमतदार व युवा मतदारांची नोंदणी मोठ्या संख्येने होत आहे. ही युवा शक्ती निवडणुकीचा निकाल बदलू शकते इतकी आहे.
शहरातील एकूण 16 लाख 47 हजार 837 मतदारांपैकी तरुण मतदारांची संख्या 3 लाख 12 हजार 674 इतकी आहे. सर्व गटातील मतदानांची तुलना करता मतदान करण्याचा युवक वर्गाचा आकडा सर्वांधिक असतो.
बोपखेल, दापोडीपासून ते निगडी प्राधिकरणापर्यंत पसरलेला पिंपरी विधानसभा मतदारसंघात एकूण 3 लाख 87 हजार 973 मतदार आहेत. त्यातील 67 हजार 521 मतदार हे तरुण व नवमतदार आहेत. या नव्या पिढीचा कौल पिंपरीच्या नव्या आमदारांसाठी खूपच महत्त्वाचा ठरणार आहे.
सांगवीपासून रावेत, किवळेपर्यंत असलेल्या दाट लोकवस्तीचा चिंचवड मतदारसंघ आहे. राज्यात दुसर्या क्रमांकाचा सर्वात जास्त मतदार असलेला म्हणून हा मतदारसंघ ओळखला जातो. चिंचवड विधानसभेत 6 लाख 56 हजार 157 मतदार आहेत. त्यात 18 ते 29 वयाच्या युवक मतदारांची संख्या 1 लाख 15 हजार 532 इतकी आहे.
मतदारसंघात 30 ते 39 वयोगटातील मतदारांची सर्वात जास्त 1 लाख 93 हजार 560 इतकी संख्या आहे. युवकांची पसंती ज्या बाजूला झुकणार आहे, तो चिंचवडचा नवा आमदार असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
एमआयडीसी तसेच, समाविष्ट गावांचा समावेश असलेला भोसरी मतदारसंघ आहे. मतदारसंघात 6 लाख 848 मतदार आहेत. त्यात 18 ते 29 वर्षांचे एकूण 1 लाख 29 हजार 621 तरुण मतदार आहेत. या तरुण मतदारांचा कौल ज्या उमेदवारांकडे असेल, तो उमेदवार आमदार होऊ शकतो.
युवकांचे प्रश्न सोडविणार्यांना मिळणार संधी
युवा मतदार हा महाविद्यालय विद्यार्थी आहेत. त्यात खेळाडूंही आहेत. तसेच, त्यातील काहींनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून नोकरी सुरू केली आहे. तर, काही नोकरीच्या शोधात आहेत. या नव्या पिढीतील तरुण मतदारांचा कौल विधानसभेसाठी निर्णायक ठरणार आहे.
युवकांशी निगडित महाविद्यालयीन शिक्षण, दर्जेदार शिक्षण, उच्च शिक्षणांच्या संधी, भरमसाट फी, वाहतूक समस्या, रोजगार, उद्योगांच्या संधी, आरक्षण, तरुणींची सुरक्षा असे अनेक प्रश्न व समस्यांशी त्यांचा दररोजचा सामना होत आहे. या नियमित समस्या लक्षात घेऊन ते आपला प्रतिनिधी म्हणजे आमदार निवडतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.