Pimpri Work: अद्यापही पिंपरी, कासारवाडी येथे कामे सुरूच; मेट्रोच्या कासवगती कामामुळे चालकांकडून संताप

कामासाठी वारंवार त्या मार्गावरील वाहतूक बंद केली जात असल्याने वाहनचालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
pimpri News
अद्यापही पिंपरी, कासारवाडी येथे कामे सुरूच; मेट्रोच्या कासवगती कामामुळे चालकांकडून संतापPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी ते फुगेवाडी या मार्गावर मेट्रो सुरू होऊन तीन वर्षे झाली आहेत. मेट्रोतून प्रवासाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. असे असताना पिंपरी व कासारवाडी येथे मेट्रो स्टेशनचे काम अद्याप कासव गतीने सुरूच आहे. या कामासाठी वारंवार त्या मार्गावरील वाहतूक बंद केली जात असल्याने वाहनचालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मेट्रो मार्गिका आणि स्टेशनचे प्रत्यक्ष काम पिंपरी-चिंचवड शहरात सन 2017 ला सुरू झाले. पहिला पिलर 25 ऑक्टोबर 2017 ला शंकरवाडी येथे उभा करण्यात आला. संत तुकारामनगर मेट्रो स्टेशन सर्वांत प्रथम तयार झाले. शहरात मेट्रोचे डबे 29 डिसेंबर 2019 ला दाखल झाले. सर्व काम पूर्ण झाल्यानंतर कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टीची (सीएमआरएस) परवानी 6 जानेवारी 2022 ला मिळाली. (Latest Pimpri News)

pimpri News
Prafull Lodha News: प्रफुल्ल लोढावर बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

त्यानंतर पिंपरी ते फुगेवाडी असे. 5.8 किलोमीटर अंतरावर मेट्रो धावू लागली. सुरूवातीला केवळ कुतूहल म्हणून नागरिक मेट्रोचा प्रवास करीत होते. आता, पिंपरी-चिंचवड आणि पुणे या दोन्ही मेट्रो मार्गावर सर्वाधिक विक्रमी महसूल पिंपरी स्टेशन येथून मिळत आहे. पिंपरी स्टेशनसह इतर स्टेशनवरून प्रवास करण्यास नागरिक मोठी पसंती देत आहेत.

असे असले, तरी अद्याप मेट्रोची कामे काही संपता संपत नाहीत. मेट्रो सुरू होऊन तीन वर्षे लोटली तरी, मेट्रो स्टेशनची अनेक कामे प्रलंबित आहेत किंवा रखडली आहेत. पुणे शहराच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, संत तुकाराम नगर, नाशिक फाटा, कासारवाडी, फुगेवाडी व दापोडी हे सर्व सहाही मेट्रो स्टेशन कलात्मक व आकर्षक नसल्याचा आरोप होत आहे. केवळ ठोकळेबाज स्टेशन असल्याने शहरवासीयांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

त्या कासव गतीने काम सुरू असल्याने रोष व्यक्त केला जात आहे. नाशिक फाटा मेट्रो स्टेशन हे शहरातील सर्वांत उंचीवरील स्टेशन आहे. तेथील काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने रात्री हा मार्ग वाहतुकीसाठी वारंवार बंद केला जात आहे. त्यामुळे उर्वरित एका मार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी होऊन वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागत आहेत. या सातत्याच्या कोंडीमुळे वाहनचालक वैतागले आहेत.

तसेच, पिंपरी मेट्रो स्टेशनचेही उर्वरित कामे अजून सुरूच आहेत. कमला क्रास बिल्डिंग येथील स्टेशनच्या चौथ्या जिन्याचे काम सुरू आहे. त्यासाठी बीआरटी मार्ग व सर्व्हिस रस्ता वारंवार बंद केला जात आहे. परिणामी, वाहतूक कोंडी होऊन वाहनचालकांसह पादचार्‍यांची गैरसोय होत आहे.

pimpri News
Pimpri News: आयुक्तांसह तीनही अतिरिक्त आयुक्त महापालिका भवनात गैरहजर

ही दोन्ही कामे कासव गतीने सुरू असल्याने कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी वाढली आहे. मेट्रो सुरू होऊन तीन वर्षे झाले तरी, मेट्रोला आपली कामे पूर्ण करता आली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. महापालिका तसेच, वाहतूक पोलिसांनी या प्रकाराची दखल घेऊन महामेट्रोला समज देण्याची गरज आहे.

दुभाजक सुशोभीकरणास विलंब

मेट्रोच्या कामासाठी दापोडी ते निगडी मार्गावर दुभाजक तोडण्यात आले आहेत. ते दुभाजक दुरुस्त करून त्यात झाडे लावण्यात आलेली नाहीत. झाडे लावून सुशोभीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. रिकाम्या दुभाजकात दगड, कचरा व झुडपे वाढल्याने परिसर विद्रूप दिसत आहे.

वाहतुकीस अडथळा होऊ नये याची दक्षता घ्यावी :

वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची खरबदारी घेऊन काम पूर्ण करण्यास महामेट्रो प्रशासनाला सांगण्यात आले आहेत. तसेच, वाहनचालकांची गैरसोय होणार नाही, तसेच, सुरक्षेकडे लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे महापालिकेच्या शहरी दळणवळण विभागाचे सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी सांगितले आहे.

स्टेशनची उर्वरित कामे पूर्ण करण्यात भर:

मेट्रो स्टेशनची सर्व कामे झाली आहेत. परवानगी न मिळाल्याने तसेच, इतर कारणामुंळे काही प्रलंबित कामे होती. ती उर्वरित कामे वेगात पूर्ण करण्यात येत आहेत. रस्त्यावर काम करायचे असल्याचे सुरक्षा म्हणून वाहतूक बंद केली जाते. वर्दळ कमी झाल्यानंतर रात्री अकरानंतर रस्ते बंद केले जातात. काम झाल्यानंतर पुन्हा रस्ता खुला केला जातो, असे महामेट्रोचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनवणे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news