

वडगाव मावळ: श्रीक्षेत्र पंढरपूरच्या आषाढी वारीची लगबग सुरू झालेली असतानाच सातासमुद्रापार एक नवा इतिहास रचणाऱ्या लंडनहून थेट पंढरपूरसाठी सुरू झालेल्या पहिल्या 'ग्लोबल वारी'चे शुक्रवारी (दि. ३) मावळ तालुक्यात श्री अमरदेवी मंदिर येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
विमानतळावर घुमला विठुनामाचा गजर
भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या हस्ते लंडनच्या रॉयल विंडसर रेसकोर्सवरून सुरू झालेली ही पालखी तब्बल ११ देशांचा प्रवास करून भारतात दाखल झाली असून, शुक्रवारी सकाळी तिचे मावळ तालुक्यातील शेलारवाडी येथे अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले. लंडनस्थित श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती आणि अनिवासी भारतीय विठ्ठल भक्तांच्या पुढाकाराने या अनोख्या आणि ऐतिहासिक दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. परदेशातील विठ्ठलभक्तांनी ऐतिहासिक पाऊल टाकत सुरू केलेल्या या पालखीचे १ जुलै रोजी मुंबई विमानतळावर आगमन झाले. विमानतळावर भाविकांनी विठुनामाच्या गजरात पालखीचे जंगी स्वागत केले.
दर्शनासाठी भाविकांची गर्दी
त्यानंतर मुंबईतील ताडदेव येथे भाविकांच्या दर्शनासाठी विशेष कार्यक्रम व मुक्काम आयोजित करण्यात आला होता. गुरुवारी सकाळी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज व संस्थानचे माजी अध्यक्ष ह.भ.प. रामदासमहाराज मोरे (इनामदार), श्रीक्षेत्र घोराडेश्वर प्रासादिक दिंडीचे अध्यक्ष ह.भ.प. मुकुंद राऊत यांच्या हस्ते पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. या वेळी बाळासाहेब काशिद, मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाचे संस्थापक ह.भ.प. संतोषमहाराज शेलार, दिंडीचे खजिनदार दिलीप विधाटे, रामहरी शेलार, नवनाथमहाराज शेलार उपस्थित होते. दुपारी घाटकोपर आणि सायंकाळी नेरूळ येथे पालखीचा मुक्काम झाला.
प्रसादाचे वाटप
लंडनवरून निघालेली ही वारी आज सकाळी मावळ तालुक्यातील इंद्रायणी हॉटेल येथे पोहोचली. भरत शंकरराव शेलार व परिवाराच्या वतीने पालखीचे स्वागत करून प्रसाद वाटप करण्यात आले. त्यानंतर दुपारी शेलारवाडी येथील श्री अमरदेवी माता मंदिरात पालखीची आगमन झाले. या वेळी अशोकराव शेलार, पोपटराव भेगडे, रवींद्र शेलार, रघुवीर शेलार आणि समस्त ग्रामस्थ मंडळींच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. यानिमित्ताने अमरदेवी महिला भजनी मंडळाचा हरिपाठ आणि ग्रामस्थ भजनी मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला व पालखी पुढच्या प्रवासाला मार्गस्थ झाली.
शनिवारी देहूकडे होणार मार्गस्थ
या पालखीचे पुढे वाकडकडे प्रस्थान झाले असून, पालखीचा मुक्काम बावधन येथे होणार आहे. शनिवारी (४ जुलै) सकाळी ११ वाजता ही पालखी श्रीक्षेत्र देहूकडे मार्गस्थ होईल आणि तिथेच मुक्कामी राहील. रविवारी (५ जुलै) सकाळी ११ वाजता पालखी श्रीक्षेत्र आळंदीकडे प्रस्थान करेल आणि रात्री तिथे मुक्काम असेल. सोमवारी (६ जुलै) सकाळी ही ऐतिहासिक पालखी पुढील प्रवासासाठी थेट श्रीक्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ होईल. या संपूर्ण सोहळ्याचे नियोजन मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाचे संस्थापक ह.भ.प. संतोषमहाराज शेलार यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. परदेशातून सुरू झालेल्या या ऐतिहासिक पालखी सोहळ्याच्या नियोजनाची जबाबदारी मिळणे हा मोठा बहुमान असून, मावळ तालुक्यातील सर्व विठ्ठलभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन संतोषमहाराज शेलार यांनी केले आहे.