

पिंपरी : गणपती सजावट म्हटलं की नेहमीच पुठ्ठा, लाकूड किंवा कापडाची, फोमशीटची मखर पाहण्यात येतात. मात्र, हटके सजावटीसाठी खण आणि पैठणीच्या कापडापासून बनविलेली मखर आणि आसन उपलब्ध झाली आहेत. (pcmc Latest News)
ही मखरे आणि आकर्षकही दिसतात आणि वर्षभरातील इतरही सणासमारंभासाठी वापरता येतात. खण आणि पैठणी हे आत्तापर्यंत फक्त साडी आणि ड्रेसमध्येच पाहिली होती. मात्र, आता याचा वेगळा प्रयोग गणपती सजावटीसाठी केला जात आहे.
काही वेळेस भाविक घरातील साड्यां आणि ओढण्यांचीदेखील गणपतीला सजावट करतात. सोनेरी, चंदेरी काठपदराच्या साड्या मागे आणि डावी - उजवीकडे लावून पडदा केला जातो. त्यासाठी पाईप, बांबू अशा खूप सार्या गोष्टींची आवश्यकता असते.
सजावट म्हटली की, खूप सार्या वस्तू विकत घेतल्या जातात. उदा. गणपतीच्या मागे कोणती सजावट करायची, गणपतीला आसन कोणते असावे, त्याबरोबरच फुलांची सजावट, झुरमुळ्या, लायटिंग आलीच त्यामुळे वेगवेगळ्या वस्तूंचा पसारा होतो. शिवाय उत्सव संपला की त्या ठेवायच्या कुठे, हा प्रश्न असतो. कारण बर्याच वस्तू चुरगळतात, त्यांचा रंग उडतो. नंतर त्या वापरता येत नाही.
मात्र, हे खण आणि पैठणी कापडातील मखर वॉशेबल आहेत आणि घडी करून ठेवता येतात. यामध्ये समई आसन, वस्त्र, केळीचे पान, कमळ आसन, तोरण उपलब्ध आहेत.
वेलवेट या प्रकारातील विविध रंगातील मखरे देखील आकर्षक दिसतात. यामध्ये गणपतीचे पैठणी व खण साडीतले मखर ट्रेंडमध्ये आहेत. पैठणी आणि खण साडीच्या कापडापासून बनविलेले तोरण, आसन, मागील पडदा तोही पैठणी कापडाचाच. यामध्ये पैठणी आणि खण कापडातील विविध रंग देखील उपलब्ध आहेत. ज्याप्रमाणे साड्यांमध्ये व्हारायटी आहे, तशीच या मखरांमध्येदेखील आहे. त्यामुळे कोणता रंग घ्यायचा, यासाठी अनेक ऑप्शन्स आहेत.