

पिंपरी: आयटी हबमध्ये कामाला लावतो, असे सांगत फसवणूक करण्यात आली. ही घटना हिंजवडी येथे घडली. याप्रकरणी उपेश रंजीत पाटील (रा. हिंजवडी फेस 2) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच त्याच्या महिला साथीदाराच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे.
मयूर मुकुंद वाघ (24, रा. काळेवाडी फाटा) यांनी शनिवारी (दि. 23) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी फिर्यादी व इतर उमेदवारांकडून 1 लाख ते अडीच लाख रुपये प्रशिक्षण शुल्काच्या नावाखाली घेतले. (Latest Pimpri News)
गुगल मिटद्वारे तीन महिन्यांचे ट्रेनिंग दिल्यानंतर नियुक्तीपत्र, ऑफर लेटर व पगार पत्रे देऊन विश्वास संपादन केला; मात्र नंतर नापास झाल्याचे सांगत कोणताही पगार न देता आरोपींनी संपूर्ण रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून घेतली.
याप्रकरणी आरोपींनी एकूण 17 लाख 16 हजारांचा अपहार केला आहे. हिंजवडी पोलिस याबाबत तपास करीत आहेत. याबाबत पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे म्हणाले की, या गुन्ह्याकडे सुरूवातीपासूनच गांभीर्याने लक्ष्य दिले होते. तक्रार आल्यानंतर पाटील याला अटक केली आहे. अजून कोणाची अशा प्रकारे फसवणूक झाली असल्यास त्यांनी हिंजवडी पोलिसांशी संपर्क साधावा.