

पिंपरी: पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरात अन्नपदार्थ, मिठाई आणि औषधांवर देखरेख ठेवण्याचे काम एफडीए अर्थात अन्न व औषध प्रशासनाचे असते. त्याअनुषंगाने तपासणी, चाचणी आणि प्रत्यक्ष पाहणी करण्यात येते. या तपासणीत भेसळ, त्रुटी अथवा नियमांचे उल्लंघन केले असल्याचे आढळून आल्यास कारवाई केली जाते; मात्र प्रत्यक्षात नमुन्याचा अहवाल येण्यास विलंब होत असल्याने एफडीएकडून कारवाई केवळ कागदावर होत असल्याचे दिसून येते.
ढाबे, तसेच हॉटेल संख्या वाढत आहे. हॉटेल व्यावसायिकांवर अन्न व औषध प्रशासनाची जुजबी कारवाई होते. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील हॉटेल आस्थापना, तसेच अन्नपदार्थ विक्रेते आणि अन्न भेसळ करणार्यांकडे दुर्लक्ष होत आहे. अपुरे कर्मचारी संख्या आणि तपासणीत होणारी टाळाटाळ यामुळे भेसळ करणार्यांचे फावत असल्याचे दिसून येते. (Latest Pimpri News)
सन 2011 पर्यंत अन्न भेसळ करणार्यांवर महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत केली जात होती. महापालिका क्षेत्रातील अन्न भेसळप्रकरणी तक्रार येताच, काही वेळातच अन्न पर्यवेक्षक आणि त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचत असे. अन्नसुरक्षा व मानके कायदा अस्तित्वात आल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील अन्न पर्यवेक्षक, अन्न निरीक्षक पदावरील कर्मचारी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पुणे कार्यालयाच्या अखत्यारित काम करू लागले.
जिल्ह्यातील मिठाईची दुकाने, हॉटेल, खानावळ आणि कच्चा माल, किराणा दुकानांची तपासणी करण्याचे अधिकारी एफडीए प्रशासनाला आहे. या माध्यमातून होणारी भेसळ, मुदबाह्य वस्तूवर आळा बसतो. तपासणीनंतर असा काही प्रकार आढळल्यास नोटीस देण्यात येते. तसेच, त्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. त्याचा अहवाल आल्यानंतर कारवाई होते. मात्र, नोटीसनंतर प्रत्यक्षात कारवाई होत नसून, अहवालाची वाट पाहावी लागते.
दुकाने, आस्थापनांची दैनंदिन तपासणी सुरू आहे. त्याबाबत अधिकारी, कर्मचारी यांना सूचना दिल्या आहेत. तसेच, नागरिकांच्या तक्रारीही येतात. भेसळ अथवा काही त्रुटी आढळल्यास एफडीएकडे तक्रार करावी. संबंधितांवर निश्चित कारवाई केली जाईल.
- सुरेश अन्नपुरे, सह आयुक्त, पुणे