Pimpri Politics: भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घमासान? आगामी महापालिका निवडणुकीसाठी मोर्चे बांधणीस वेग

महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे दोन पक्ष आमनेसामने आल्याचे दिसत आहे.
Pimpri News
भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घमासान? आगामी महापालिका निवडणुकीसाठी मोर्चे बांधणीस वेगFile Photo
Published on
Updated on

मिलिंद कांबळे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक तब्बल साडेआठ वर्षांनंतर होत आहे. त्यासाठी महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे दोन पक्ष आमनेसामने आल्याचे दिसत आहे. त्या दोन प्रमुख पक्षात निवडणूक घमासान रंगण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे महापालिकेच्या निवडणुका घेण्यात येत आहेत. शहरातील चार सदस्यीय 32 प्रभागांची रचना महापालिकेने तयार केली आहे. लवकरच तो आराखडा नगर विकास विभाग आणि तेथून राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविली जाणार आहे. (Latest Pimpri News)

Pimpri News
Pimpri News: थकबाकीदारांच्या कार, टीव्ही, फ्रीज जप्त करणार; सव्वालाख निवासी मालमत्ताधारकांकडे 310 कोटींची थकबाकी

ऑगस्टमध्ये 22 तारखेला प्रारूप प्रभागरचना जाहीर केली जाईल. त्यावर सुनावणी झाल्यानंतर प्रभागरचना अंतिम होईल. त्यानंतर आरक्षण सोडत आणि प्रत्यक्ष निवडणुकीचे वेळापत्रक घोषित होऊन निवडणुकीची रणधुमाळी सुरू होईल.

या निवडणुकीसाठी महायुतीसह महाविकास आघाडीतील घटक पक्ष तसेच, इतर पक्ष सरसावले आहेत. प्रभागनिहाय बैठकांसह, बूथ कमिटी तसेच, आमदारांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. शहरात भाजपाचे चार तर, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार आहे.

शिवसेनेचा (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रत्येकी एक खासदार आहे. प्रदेशाध्यक्ष तसेच, वरिष्ठ नेते व शहर प्रभारींकडून पिंपरी-चिंचवड शहरासह माजी नगरसेवकांसह इच्छुकांचा आढावा घेतला आहे. वेगवेगळ्या पातळीवर प्रभागनिहाय सर्वेक्षणही केले जात आहे.

सत्तेतील भाजप महापालिकेची सत्ता पुन्हा मिळविण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करीत आहे. नवनियुक्त शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्यासह चारही आमदार तयारीला लागले आहे. बैठकांचा धडका लावला आहे. या प्रमुखांकडे प्रभागांच्या जबाबदारीची विभागणी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

तर, महायुतीतीलच अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फेब्रुवारी 2017 मध्ये निसटलेली महापालिका पुन्हा ताब्यात घेण्यासाठी एकवटली असल्याचा दावा केला जात आहे. विधानसभेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले अजित गव्हाणेंसह 20 ते 25 माजी नगरसेवक पुन्हा परतले. शहराध्यक्ष योगेश बहल यांनी विखुरलेले सर्व गटतट एकत्रित करून एकदिलाने काम करण्याचा सपाटा लावला आहे.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे आहे. महापालिकेची 2017 मध्ये हातातून गेलेली सत्ता तसेच, मुलगा पार्थ पवार याचा लोकसभेतील पराभव भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी सरसावली आहे. अजित पवार हे स्वत: जातीने शहरात लक्ष घालत आहेत. शहरात वारंवार येण्याचे सत्र त्यांनी सुरू केले आहे.

महापालिकेच्या कार्यक्रमांसह पक्षाच्या मेळाव्यात उपस्थित राहून ते पक्षात संजीवनी आणत आहेत. तसेच, पुण्यात बैठका घेऊन पदाधिकार्‍यांना कानमंत्रही देत आहेत. महापालिका कामकाजावरही त्यांचे बारिक लक्ष असून, वेगवेगळ्या बैठकांमध्ये आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडून कामकाजाचा आढावा घेत आहेत. त्यांचे हे पिंपरी-चिंचवड प्रेम भाजपला अडचणीचे ठरू शकते.

दोन्ही मित्रपक्ष स्वतंत्र लढणार ?

महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यादृष्टीने दोन्ही पक्ष जोरदार तयारी करीत आहेत. सक्षम उमेदारांची संख्या अधिक असल्याचा दावा दोन्ही पक्षाकडून केला जात आहे. पक्षश्रेष्ठींनीही स्वतंत्र लढण्यास हिरवा कंदिल दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे भाजपा व राष्ट्रवादी आमनेसामने येणार आहेत. तसेच, शिवसेनेनेही (एकनाथ शिंदे) एकला चलो रे...च्या नारा दिला आहे.

Pimpri News
Talegaon Traffic: तळेगावातील वाहतूककोंडी सोडविण्यास प्रशासन अपयशी

आरोप-प्रत्यारोपांच्या फैर्‍या

विधानसभेला गेलेले माजी नगरसेवक स्वगृही परतले. त्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी भाजपवर जोरदार टीका करीत पिंपरी-चिंचवड विकास राष्ट्रवादीने केल्याचा दावा केला आहे. अजित पवारांनी लक्ष घालून नियोजबद्ध शहर विकसित केल्याचा मत शहराध्यक्ष योगेश बहल, माजी आमदार विलास लांडे, माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह अनेकांनी मांडला. त्याला उत्तर देताना भाजपाच्या आमदार महेश लांडगे यांनी खडलेल्या कामांबाबत आम्ही पाठपुरावा करून ती पूर्णत्वास नेली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मान्यता दिल्याने शहरातील अनेक प्रश्न मार्गी लागले. आम्ही केलेल्या कामाचेच श्रेय घेतो, असा दावा केला. त्या टीकेवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. अधून-मधून दोन्ही पक्षात आरोप-प्रत्यारोपाच्या फैर्‍या झडत आहेत.

महापालिकेवर आपलाच झेंडा फडकला पाहिजे

काहीही करा, पिंपरी-चिंचवड महापालिकेवर आपलाच झेंडा फडकला पाहिजे, असे आदेश भाजपा तसेच, राष्ट्रवादी काँगेसला स्थानिक पदाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. कामाला लागा. जिंकणार्‍या सक्षम इच्छुकांनाच उमेदवारी द्या. झपाटून कामाला लागा. आपल्या प्रभागातील प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचा. राज्य सरकाराने केलेली कामे, योजना, धोरणे मतदारांपर्यंत पोहचवा. शहरासाठी नेत्यांनी केलेली कामे आवर्जून सांगा, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यादृष्टीने स्थानिक पदाधिकार्‍यांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे.

महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस जड ठरण्याची भीती असल्याने भाजपनेही कंबर कसली आहे. कामांच्या माध्यमातून भाजप पुढे येत आहे. राष्ट्रवादीच्या आरोपावर जाहीरपणे उत्तरे दिली जात आहेत. केलेल्या कामांचा पाढा वाचला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापालिकेच्या कामांचे उद्घाटन व भूमिपूजन केले जात आहेत. मुख्यमंत्र्यासोबत तसेच, आयुक्तांसोबत बैठका घेऊन कामांचा सातत्याने आढावा घेत प्रकरणे तडीस लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहरात स्मार्ट बदल केल्याचा दावा भाजप करीत आहे. असे चित्र असले तरी, राष्ट्रवादीच्या आक्रमकतेवर भाजपा कसा तोडगा काढतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

स्वबळावर लढण्याची राष्ट्रवादीचीही तयारी

आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने आमची तयारी सुरूच आहे. येत्या आठवड्याभरात शहर कार्यकारिणी जाहीर केली जाईल. प्रभागानिहाय सूक्ष्म आढावा घेतला जात आहे. स्वबळावर लढण्यासाठी सर्वच पक्ष तयारी करीत आहेत. आम्हीही 128 सक्षम उमेदवार तयार ठेवले आहेत. अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जे निर्णय घेतील, त्यानुसार महायुती की स्वबळावर लढायचे हे ठरवले जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी सांगितले.

भाजपचा 100 प्लसचा नारा

सर्व 32 प्रभागांत भाजपच्या 128 उमेदवारांची यादी तयार आहे. सर्व चारही आमदार शहरात सक्रिय आहेत. शहरात 3 लाखांपेक्षा अधिक सदस्य नोंदणी झाली आहे. पक्ष संघटनेची बांधणी पूर्ण झाली आहे. मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. आठवड्याभरात शहर कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे. महापालिका बरखास्त होऊन तीन वर्षे झाले तरी, भाजप प्रत्येक प्रभागात सक्रिय काम करीत आहे. महायुतीत निवडणूक लढण्याचा निर्णय वरिष्ठ घेतील. मात्र, स्थानिक पातळीवर स्वबळावर लढण्याची तयारी आम्ही केली आहे. चार सदस्यीय प्रभाग रचनेत यंदा भाजपा शंभर नगरसेवकांची संख्या पार करणार, असा विश्वास भाजपाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news