

बाळू महाजन
चिंचवड: दिवाळीच्या सुट्यांमध्ये गावी जाण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील नागरिकांची लगबग सुरू झाली असतानाच खासगी बस आणि ट्रॅव्हलच्या तिकीट दरात दुप्पट वाढ झाली आहे. यामुळे पिंपरी चिंचवड शहरातून मूळ गावी जाणाऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. प्रवासाचे अंतर, बसचा प्रकार आणि मागणीनुसार तिकीटाची दर बदलत आहेत. विशेषतः एकाच कुटुंबातील चार-पाच सदस्यांना प्रवासासाठी मोठी रक्कम खर्च करावी लागत आहे. खासगी वाहने भाड्याने घेतानाही इंधन, टोल आणि चालकाचे मानधन यामुळे खर्च वाढला आहे. महागाईच्या काळात फराळ, कपडे आणि इतर सणखर्चात प्रवाशांच्या वाढीव खर्चाची भर पडल्याने कमी उत्पन्न गटातील कामगारांना गावी जाणे कठीण झाले आहे.
दिवाळीत ऐनवेळी गावी जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वेचे तिकीट मिळत नाही. त्यामुळे अशा प्रवाशांसाठी खासगी बस हा एकमेव पर्याय आहे. पुण्यात नोकरी, शिक्षण आणि व्यवसायनिमित्त बाहेरच्या राज्यातील आणि जिल्ह्यातील वास्तवात असलेले अनेक नागरिक दिवाळीसाठी आपल्या गावी जातात. त्यामुळे खान्देश, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रकडे जाणाऱ्या बसेसना मोठी मागणी असते. शिवाय रेल्वे गाड्यांचे आरक्षण दोन महिने आधीच फुल झाल्याने व एसटी आरक्षण उपलब्ध नसल्याने प्रवाशांचा भार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिक खासगी बस व ट्रॅव्हल्सचा पर्याय निवडतात.
नियमांचे पालन करण्याचे आवाहन
पिंपरी- चिंचवड ते परभणी, नांदेड, जालना, अमरावती, नागपूर, भंडारा प्रवाशांसाठी ३००० ते ३५०० रुपये तिकीट दर आकारले जात असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर आरटीओने ऑनलाइन तिकीट बुकिंग, प्लॅटफॉर्म आणि खासगी बसचालकांच्या भाडे आकारणीवर लक्ष केंद्रित केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार खासगी कंत्राटी प्रवासी वाहनांना संबंधित मार्गावरील एसटीच्या नियमित भाड्याच्या दीडपटापेक्षा अधिक भाडे आकारता येणार नाही. या मर्यादितचे उल्लंघन करून जादा दर आकारल्यास संबंधी विरुद्ध कारवाई केली जाऊ शकते. एस. टी. महामंडळाकडून निश्चित करण्यात आलेल्या भाडेदाराच्या आधारे खासगी बसचे कमाल भाडे निश्चित करण्याबाबत आरटीओने सूचना दिल्या आहेत.
२० नोव्हेंबरपर्यंत विशेष मोहीम
दिवाळीच्या काळात खासगी बचालकाकडून जादा भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर २४ ऑक्टोंबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मोहिमेसाठी चार वायूवेग पथके कार्यरत करण्यात आली आहेत. बस सुटण्याची ठिकाणी खासगी बसचे बुकिंग कार्यालयास आणि प्रत्यक्ष रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाणार आहे. आरटीओकडून राबविण्यात येणाऱ्या मोहिमेत जादा भाडे आकारणीबरोबरच विनापरवाना वाहतूक, परवान्याच्या अटीचा भंग, नियमबाह्य टप्पा वाहतूक आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेण्याच्या प्रकाराची तपासणी होणार आहे. बसचे योग्यता प्रमाणपत्र, मोटार वाहनकर, अग्निशमन यंत्रणा, आपत्कालीन निर्गमन दरवाजा, पेनिक बटन, रिप्लेक्टर, इंडिकेटर, टेललाईट आणि वायपर याची स्थितीही तपासणार आहे. प्रवासी बसमधून अवैध मालवाहतूक होते का, वाहनात बेकायदेशीर फेरबदल केलेत का याची पडताळणी केली जाणार आहे.
दरात दुप्पट ते तिप्पट वाढ
दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. विशेषतः पिंपरी चिंचवडमधून खान्देश, मराठवाडा, विदर्भ, सोलापूर, सांगली या ठिकाणांचे प्रवाशांची संख्या जास्त असते. दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याने खायगी बसच्या तिकिटत दरात मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. रेल्वे आणि एसटीचे आरक्षण उपलब्ध नसल्याने खासगी बसचा पर्याय निवडणाऱ्या प्रवाशांना नेहमीच्या तुलनेत दुप्पट ते तिप्पट भाडे मोजावे लागत आहे.
वर्षातून एकदा मुलांसहित आम्ही दिवाळीला कुटुंबासह गावी जाण्याचे नियोजन दरवर्षी करतो. चार-पाच जणांचे येण्या- जाण्याचे तिकीट काढायचे म्हटले की मोठी रक्कम खर्च होते. सण साजरा करायचा की खर्चाचा विचार करायचा?, असा प्रश्न पडतो.
पूजा निकुंभ, गृहिणी
दरवर्षीप्रमाणे याही सणासुदीच्या काळात जादा दर आकारणाऱ्या ट्रॅव्हल्स कंपन्या आणि एजंटावर कारवाई केली जाणार आहे. पिकअप पॉईंट आणि महामार्ग खासगी बसची तपासणी केली जाणार आहे. नागरिकांनी आरटीओ प्रशासनाकडे तक्रार केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.
राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड