

नवी सांगवी : महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये 1 एप्रिलपासून ऑनलाईन नोंदणीपद्धत सुरू झाली आहे. यामध्ये ऑनलाइन नोंदणी करताना अनामत रक्कमही घेण्यात येते. मात्र, कार्यक्रम होऊन दोन महिने झाले तरी ती रक्कम अजून बुकिंग केलेल्या नागरिकांना मिळता मिळेना. याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.(Latest Pimpari chinchwad News)
नवी सांगवी येथील निळू फुले नाट्यगृहमध्ये सद्यस्थितीत 18 जणांचे 10 हजार दोनशे रुपयांप्रमाणे 1 लाख 83 हजार सहाशे तर, 3 जणांची 17 हजार 500 रुपयांप्रमाणे 52 हजार 500 रुपये अशी एकूण 2 लाख 36 हजार 100 रुपये इतकी अनामत रक्कम महापालिकेकडे जमा आहे. ही अनामत रक्कम तीन महिने होत आले तरी परत मिळेना. यासाठी नागरिक सतत नाट्यगृहाच्या पायऱ्या चढून येथील व्यवस्थापक यांच्याकडे विनवणी करीत आहेत.
शासनाचे दुर्लक्ष
पिंपरी-चिंचवड शहरात चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृह, पिंपरी येथील आचार्य अत्रे नाट्यगृह, नवी सांगवी येथील निळू फुले नाट्यगृह अशी एकूण शहरात पाच नाट्यगृह आहेत. या सर्व नाट्यगृहांमध्ये नाटक, लावण्या, ऑर्केस्ट्रा, सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध सामाजिक कार्यक्रमांची सतत मोठ्या प्रमाणात रेलचेल सुरू असते. सुरुवातीला या नाट्यगृहांमध्ये रजिस्टर पद्धतीने नोंदणी तसेच रीतसर अनामत रक्कम पावती आकारुन झटपट नोंदी प्रक्रिया होत असे. मात्र, 1 एप्रिलपासून ऑनलाईन प्रणाली सुरू केली आहे; परंतु ही ऑनलाईनपद्धत अतिशय किचकट स्वरुपाची व अधिक कागदोपत्री अपलोड करण्याची असल्यामुळे याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
अनामत रकमेवर व्याज देण्याची मागणी
तंत्रज्ञानाच्या युगात कार्यालयीन व नागरिकांच्या सोईच्यादृष्टीने 1 एप्रिलपासून संगणकीय प्रक्रियेद्वारे ही अनामत रक्कम भरण्याची सुविधा किचकट पद्धतीने केली असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊन कार्यालयीन सोय मात्र झाली आहे. एरवी नागरिकांनी महापालिकेच्या तथा शासनाच्या कोणत्याही कर विभागाकडील रक्कम एक दोन दिवसही उशिराने भरली गेली तर त्यावर व्याज आकारले जाते. नागरिकही स्वत:ची चूक समजून व्याजासह कर रूपी रक्कम अदा करतात;
परंतु त्याच पद्धतीने महापालिकेकडून अशा चुका झाल्या तर त्याचे व्याज महापालिका नागरिकांना परत करेल का? असा प्रश्न नागरीक आता विचारू लागले आहेत. असाच काहीसा प्रकार नवी सांगवी येथील निळू फुले नाट्यगृहांच्या बाबतीत घडत आहे. नागरिकांनी विविध कार्यक्रमांसाठी अनामत रक्कम भरली आणि कार्यक्रम झाल्यानंतर रकमेसाठी नाट्यगृह व्यवस्थापनाकडे मागणी करीत आहेत.
तीन महिन्यांनंतर किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीपर्यंत अनामत रक्कम महापालिकेकडे राहिल्यास महापालिका व्याजासह अनामत रक्कम नागरिकांना परत करणार का?, नियम फक्त कर भरणाऱ्या नागरिकांना आहे का? असा प्रश्न आता नागरीक विचारत आहेत.
नागरिक त्रस्त
इतकेच नव्हे, तर नागरिकांनी कार्यक्रमाची ऑनलाइन प्रणालीनुसार भरलेली अनामत रक्कम परत मिळविण्यासाठी कार्यक्रम झाल्यावर पुन्हा ऑनलाईन पद्धतीने महापालिकेला मागणी करावी लागत आहे. त्यासाठी पुन्हा कागदपत्रे अपलोड करावी लागत असल्याने नागरिकांना नाहक त्रास आणि वेळ वाया जात आहे. इतके करूनही महापालिकेकडून दोन महिने होऊन गेले तरी अजूनही अनामत रकमेचा परतावा मिळत नाही, यासाठी अनेकदा नाट्यगृहाच्या पायऱ्या चढाव्या लागत आहेत.
नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन प्रणाली किचकट स्वरुपाची आहे. कार्यक्रम झाल्यावर भरलेले डिपॉझिट मिळविण्यासाठी ऑनलाइन प्रणाली पुन्हा करावी लागत आहे. यासाठी पुन्हा तेच पेपर अपलोड करावे लागत आहेत. याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पूर्वीची रजिस्टर नोंदणी पद्धत चांगली होती.
आश्विन खुडे, पिंपळे गुरव
आयटीमधील तज्ञांशी नुकतीच बैठक पार पडली आहे. संगणक प्रणालीविषयी नाट्यगृह व्यवस्थापनाला प्रशिक्षण दिले आहे. यावर त्वरित उपाययोजना काढण्यासाठी सांगितले आहे. ऑनलाईन पध्दत सुटसुटीत आणि सुरळीत करण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत. येत्या आठ-दहा दिवसांत हा प्रश्न मार्गी लागेल.
पंकज पाटील, उपायुक्त क्रीडा विभाग