

पिंपरी: उच्च शिक्षणासाठी दिल्लीला जाण्यास मदत करण्याच्या बहाण्याने सोशल मीडियावर ओळख झालेल्या १९ वर्षीय तरुणीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला गहुंजे येथील सदनिकेत डांबून ठेवत लैंगिक अत्याचार केला. एवढ्यावरच न थांबता डेटिंग ॲपवर तिचे बनावट प्रोफाइल तयार करून मुंबई आणि अहमदाबाद येथे नेत देहविक्रीस भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
महेश दिवाकर पारणकर (३८, रा. गहुंजे) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. न्यायालयाने त्याला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही घटना १६ जुलै ते २२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत घडली. याप्रकरणी २३ ऑगस्ट रोजी शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी उच्च शिक्षणासाठी दिल्ली येथे गेली होती. मात्र, महाविद्यालयातील उपस्थिती कमी असल्याने तिला परीक्षेला बसता आले नाही. त्यामुळे ती घरी परतली. शिक्षणाचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून तिला पुन्हा दिल्लीला जायचे होते; मात्र सुरक्षिततेच्या कारणास्तव कुटुंबीयांनी त्यास परवानगी दिली नव्हती.
दरम्यान, सोशल मीडियावर तिची महेशसोबत ओळख झाली. दिल्लीला जाण्यासाठी रेल्वे किंवा विमानाचे तिकीट काढून देण्याचे आश्वासन देत त्याने तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तरुणी कुटुंबीयांना न सांगता त्याच्यासोबत गेली. आरोपीने तिला गहुंजे येथील सदनिकेत नेऊन तिची मूळ कागदपत्रे आणि मोबाईल काढून घेतल्याचा आरोप आहे. तिला दोन दिवस सदनिकेत डांबून ठेवत धमकी देऊन लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आरोपीने आपल्या एका मित्रालाही तेथे बोलावले आणि त्यानेही तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
डेटिंग ॲपवर बनावट प्रोफाइल
आरोपीने तरुणीला नवीन मोबाईल दिला. त्यामध्ये डेटिंग ॲप डाउनलोड करून वेगळ्या नावाने तिचे प्रोफाइल तयार केले. त्यानंतर तिला दोन वेळा मुंबई आणि एकदा अहमदाबाद येथे नेण्यात आले. तेथे तिला देहविक्रीस भाग पाडून ग्राहकांकडून पैसे घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. आरोपीच्या तावडीतून सुटण्यासाठी तरुणीने त्याचा विश्वास संपादन केला. आईला एकदा भेटण्याची विनंती केल्यानंतर तिला घरी जाण्याची संधी मिळाली. घरी पोहोचताच तिने आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर दोघींनी शिरगाव पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून महेशला अटक केली. त्याच्या साथीदारासह मुंबई आणि अहमदाबादमधील अन्य संशयितांचा शोध सुरू आहे.
आणखी एका तरुणीची कागदपत्रे
महेशच्या गहुंजे येथील सदनिकेची तपासणी करताना पोलिसांना आणखी एका तरुणीची मूळ कागदपत्रे मिळाल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी मोठी आहे का, तसेच आणखी तरुणींना अशाच पद्धतीने जाळ्यात ओढण्यात आले आहे का, या दिशेनेही पोलिस तपास करीत आहेत. संबंधित तरुणी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या पालकांनी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
या प्रकरणातील संशयिताला अटक केली असून, न्यायालयाने २८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याच्या तपासात आणखी काही नावे निष्पन्न झाली आहेत. त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
विशाल पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शिरगाव पोलीस ठाणे