

पिंपरी : चिंचवड वाल्हेकरवाडी परिसरात वकिलाच्या वडिलोपार्जित जमिनीवर अतिक्रमण करत ताबा मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोपींनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि लाईट मीटर चोरून नेले. ही घटना मार्च 2025 मध्ये घडली असून, सोमवारी (दि. 28) चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pcmc News Update)
याप्रकरणी अॅड. रोहित गोपाळ चिंचवडे (36, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनुराग प्रकाश चिंचवडे, प्रकाश धोंडिबा चिंचवडे, ज्योती प्रकाश चिंचवडे आणि प्रीतम संभाजी चिंचवडे (सर्व रा. वाल्हेकरवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅड. रोहित चिंचवडे यांचे कुटुंबीय 1972 पूर्वीपासून चिंचवड येथे राहत आहेत. सर्वे नं. 39 मधील 13 गुंठे क्षेत्र त्यांच्या ताब्यात असून तेथे चार रूम, चार गाळे आणि एक गोदाम बांधण्यात आले आहे. या ठिकाणी सुरक्षेसाठी 25 हजार रुपये किंमतीचे 6 कॅमेरे तसेच 4 लाईटचे मीटर बसविण्यात आले होते.
दरम्यान, 20 मार्च रोजी दुपारी बाराच्या सुमारास फिर्यादी यांना सीसीटीव्ही कॅमेरे गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी जागेवर जाऊन पाहणी केली असता कॅमेरे आणि लाईट मीटर चोरीस गेले असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित आरोपी दुसर्या एका कॅमेर्यात चोरी करताना कैद झाले होते. याबाबत त्यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात तक्रार केली.
त्यानंतर 29 मार्च रोजी पहाटे पाच वाजता फिर्यादी यांनी जागेवर भेट दिली असता संपूर्ण प्लॉटभोवती कंपाऊंड टाकलेले दिसून आले. तसेच, मही मिळकत अनुराग चिंचवडे यांची वडिलोपार्जित आहे, असा बोर्डही लावण्यात आला होता. त्या वेळी फिर्यादी यांनी विचारणा केली असता आरोपी अनुराग याने ङ्गही जागा माझी आहे, मी ताबा घेतला आहे. पुन्हा इथे आलास तर तुझे पाय मोडून टाकीन,ङ्घ अशी धमकी दिली. त्यानंतर 1 एप्रिल 2025 रोजी आरोपींनी जेसीबीच्या सहाय्याने बांधकाम तोडून भाडेकरूंना धमकावून जबरदस्तीने गाळे रिकामे केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलिसांनी तक्रारी अर्जाच्या तपासणीअंती गुन्हा दाखल केला आहे. चिंचवड पोलिस तपास करत आहेत.
गुन्हा दाखल झाल्याचे समजताच या प्रकरणातील काही आरोपी फरार झाले आहेत. प्रमुख आरोपी अनुराग चिंचवडे याने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत आपण आत्महत्या करणार असल्याची धमकी दिली आहे. मात्र, हा प्रकार केवळ अटकेपासून बचाव करण्यासाठी दबाव तंत्र म्हणून वापरला जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला असून, व्हिडिओच्या सत्यतेची पडताळणी केली जात आहे. आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले असून लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंकुश बांगर यांनी दिली.