

पिंपरी : गेल्या अनेक वर्षांपासून चाकण एमआयडीसी या औद्योगिक क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यावर तातडीने उपाययोजना केली जातील. त्यासाठी मसिंगल पॉईंट अॅथॉरिटी स्थापन करून कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. (Pcmc News Update)
चाकण एमआयडीसीतील वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत चाकण परिसरातील उद्योजक, लघुउद्योजकांसह आमदार महेश लांडगे, मावळ व खेड परिसरातील स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासह अपर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विभागाचे सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुख्य अभियंता, एमएसआयडीसी, मुख्य अभियंता, पुणे सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता, एमआयडीसीचे प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पोलिस उपायुक्त (वाहतूक), मुख्य अधिकारी, चाकण व तळेगाव नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
चाकण एमआयडीसीतील वाहतूककोंडी गंभीर झाली आहे. ती समस्या एमआयडीसीपुरती मर्यादित नसून, स्थानिक रहिवाशांच्या जीवनमानावरही प्रतिकूल परिणाम होत आहे. त्याबाबत आ. लांडगे यांनी बैठकीत माहिती दिली. नाशिक फाटा ते खेड हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 साठी एलिव्हेटेड कॉरिडॉर भूसंपादनासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए, एमआयडीसी, नॅशनल हायवे, पीडब्ल्यूडी किंवा जिल्हा परिषद अशा सर्व अस्थापनांशी समन्वय करण्यासाठी सिंगल पॉईंट अॅथॉरिटी स्थापन करण्यात यावी.
पिंपरी-चिंचवडमधून चाकण एमआयडीसी पट्ट्यात प्रवेश करणार्या रस्त्यांचा विस्तार आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 (हडपसर ते यवत) आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 डी (तळेगाव-चाकण-शिक्रापूर) काम सुरू करावे. यासह रस्त्यांचे विस्तारीकरण व देखभाल, वाहतूक नियंत्रण व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतूक सुधारणा, पार्किंग व्यवस्थापन, औद्योगिक वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्ग (फ—ेट कॉरिडॉर), स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत, नगरपालिका), एमएसआरडीए, पीडब्ल्यूडी, आरटीओ आणि पोलिस विभाग यांच्यात समन्वय करुन दीर्घकालीन वाहतूक मास्टर प्लॅन तयार करून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. त्याला त्याला मंत्री भोसले यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्याबाबत तातडीने पावले उचलण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
चाकण एमआयडीसी क्षेत्र वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी पाठपुरावा करीत आहोत. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासोबत बैठक झाली. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित आढावा बैठक घेण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.