

पिंपरी: नोकरी गेल्याने आलेली आर्थिक चणचण आणि वडिलोपार्जित जमिनीवरून होत असलेल्या सततच्या वादातून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. ही घटना मंगळवारी (दि. 1) दुपारी दोनच्या सुमारास बावधन बुद्रुक येथील भट्टी चाळीतील श्रीराम निवास इमारतीत घडली.
मनीषा जाधव (वय 38) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रकाश जाधव (43, रा. श्रीराम निवास, बावधन बुद्रुक) याला अटक केली आहे. याप्रकरणी प्रवीण प्रकाश जाधव (वय 18) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Latest Pimpri News)
वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल विभुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रकाश याची नोकरी गेली होती. त्यामुळे त्याला आर्थिक चणचण भासत होती. तसेच, वडिलोपार्जित जमिनीवरून त्याचे पत्नीशी सतत वाद होत असत. मंगळवारी दुपारीही दोघा पती-पत्नीत वाद झाले. या वेळी प्रकाश याने रागाच्या भरात पत्नीचा गळा दाबून खून केला.
काही वेळाने मुलगा फिर्यादी प्रवीण बेडरूममध्ये गेला असता त्याने आईला बेशुद्ध अवस्थेत निपचीत पडलेले पाहिले. तिच्या गळ्यावर लालसर व्रण दिसले. त्याचवेळी वडील प्रकाश हे रुग्णवाहिका आणण्यासाठी घराबाहेर गेले. ते परत आलेच नाहीत. प्रवीण याने त्वरीत हा प्रकार पोलीसांना कळविला. बावधन पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. आरोपी प्रकाश याचा शोध घेऊन त्याला जेरबंद करण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक तांबे तपास करीत आहेत.