

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने बोर्हाडेवाडी, मोशी येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा 100 फूट उंचीचा कांस्य धातूचा पुतळा उभारणीचे काम वेगात सुरू आहे. आतापर्यंत 75 टक्के काम पूर्ण झाले आहे. पुतळा उभारणीचे काम ऑगस्टअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
मोशी येथील पीएमआरडीएच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात छत्रपती संभाजी महाराज व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पीएमआरडीएने 2.5 एकर जागा महापालिकेच्या ताब्यात दिली आहे. ते काम धनेश्वर कन्स्ट्रक्शनमार्फत सुरू आहे. (Latest Pimpri News)
छत्रपती संभाजी महाराजांचा 100 फूट उंचीचा कांस्य धातूचा पुतळ्यासाठी 32 कोटी 84 लाख रुपये खर्च झाला आहे. प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या दिल्ली येथील फॅक्टरीत तयार केलेला संभाजी महाराज पुतळ्याचे कांस्य धातूचे सुटे भाग उभारणीच्या ठिकाणी आणून प्रत्यक्ष पुतळा उभा केला जात आहे. आत्तापर्यंत 75 टक्के काम झाले आहे. पुतळ्याच्या छातीपर्यंतचे काम झाले आहे. पुतळ्याच्या जिरेटोपापर्यंतचे काम ऑगस्ट
महिन्याअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पुतळ्याची उभारणी पूर्ण झाल्यानंतर सूक्ष्म वेल्डिंग करून, पॉलिसिंग व कोटींग करून रंग दिला जाणार आहे. तसेच, 15 कोटी खर्च करून पुतळ्याच्या 40 फूट उंचीच्या चौथरा बांधण्यात आला आहे. त्याभोवती व परिसरात बुरूज आणि दगडी बांधकाम, सीमाभिंतीचे कामही सुरू आहे. ते काम 75 टक्के झाले आहे.
अखेरच्या टप्प्यात ही कामे
पुतळ्याभोवती मावळे व सैनिकांचे पुतळे असणार आहेत. पुतळाभोवती उंच ध्वजस्तंभ उभारण्यात येणार आहे. आकर्षक ध्वनी व विद्युत प्रकाश व्यवस्था केली जाणार आहे. संभाजी महाराज यांच्या जीवनावरील मुख्य प्रसंगांवर आधारित म्युरल्स उभारले जाणार आहेत.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील तसेच, ऐतिहासिक साहित्य व शस्त्रांचे एक संग्रहालय बांधण्यात येणार आहे. परिसराचे सुशोभिकरण करून उद्यानही विकसित केले जाणार आहे. अॅम्पी थिएटर, सुशोभिकरण, विद्युत रोषणाई, प्रेक्षक गॅलरी, स्वच्छतागृह, नवीन तंत्रज्ञानावर आधारित कलाकृती साकारण्यात येणार आहेत. सुबक कलाकुरीची सजावटही केली जाणार आहे. त्यासाठी निविदाप्रक्रिया राबविण्याचे काम सुरू आहे.
व्हीआरद्वारे महाराजांचा जीवनपट उलगडणार
स्मारकाच्या परिसरात अॅग्युमेेंटेड रिअॅलिटी (एआर) आणि व्हॅच्युअल रिअॅलिटी (व्हीआर) या अत्याधुनिक आभासी तंत्रज्ञानाच्या वापर करून छत्रपत्री संभाजी महाराज यांच्या जीवनपट उलगडण्यात येणार आहे. छत्रपत्री संभाजी महाराज यांच्या आयुष्यातील विविध ऐतिहासिक घटना, त्यांचे बुद्धिकौशल्य, मृत्यूपूर्व जीवन संघर्ष, वस्त्रप्रावरण, त्यांची धर्मनिष्ठा, मुघलाविरुद्ध लढाई, त्याग आदी बाबींचा अधिक जिवंतपणे अनुभव घेण्यासाठी एसआर व व्हीआर तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. ते काम लेमन डिजाईन प्रा. लि. एजन्सी करणार आहे.
परिसरात ‘एलईडी’द्वारे रोषणाई
क क्षेत्रीय कार्यालयाच्या विद्युत विभागाकडून विद्युत कामे केली जाणार आहेत. आर्किटेक्ट किरण कलमदानी यांनी सुशोभिकरणाचे संकल्पचित्र व नकाशे तयार केले आहेत. स्मारकासाठी उच्चदाब वाहक वीजपुरवठा घेण्यात येणार आहे. कॉम्पॅक्ट सबस्टेशन, लघुदाब केबल, जनरेटर संच, अग्निशमन यंत्रणा, सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे तसेच, परिसरात एलईडीद्वारे विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. यासाठी निविदाप्रक्रिया सुरू आहे.
शहराच्या नावलौकिकात भर पडेल
छत्रपती संभाजी महाराजांच्या 100 फूट उंचीच्या पुतळ्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या नावलौकिकात भर पडणार आहे. ते दर्शनी भागात असल्याने चारही बाजूने पुतळा दृष्टीस पडणार आहे. त्यामुळे शहराच्या पर्यटनास चालना मिळणार आहे, असे महापालिकेचे सहशहर अभियंता देवन्ना गट्टूवार यांनी सांगितले.