Charholi Bridge Closure: चऱ्होली पूल बंद; वाहतूक, उद्योग व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय

इंद्रायणीवरील पुलाच्या दुरुस्तीमुळे पंचक्रोशीतील नागरिक, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्र अडचणीत
Charholi Bridge Closure
Charholi Bridge ClosurePudhari
Published on
Updated on

चऱ्होली: चऱ्होली बुद्रुक आणि चऱ्होली खुर्द या दोन्हीं गावांना जोडणारा इंद्रायणी नदीवरील सरसेनापती खंडेराव दाभाडे सरदार पुलाचे 20 डिसेंबरपासून दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी हा पूल पूर्णपणे बंद केला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरातील नागरिकांची तसेच अवजड वाहतूक करणारांची मोठी गोची होत आहे. काही किलोमीटर अंतरासाठी मोठा वळसा मारून जाण्याची वेळ चऱ्होलीकरांवर आली आहे. संबंधित प्रशासनाने पुलाचे काम लवकरात लवकर करून पूल वाहतुकीसाठी खुला करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Charholi Bridge Closure
Dehu Road Bike Theft Gang: देहूगावात मोटारसायकल चोरटोळीचा पर्दाफाश; तिघे अटकेत

चऱ्होलीचा पूल म्हणजे चऱ्होली परिसराची जीवनवाहिनी आहे. या पुलावरच आजूबाजूचे सर्व दळणवळण अवलंबून आहे; परंतु पुलाचे काम करण्यासाठी येथील वाहतूक पूर्णत: बंद केली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या फुलगाव, तुळापूर, मरकळ, सोळू, धानोरे, निरगुडी, चऱ्होली खुर्द, आळंदी देवाची आणि चऱ्होली बुद्रुक, डुडुळगाव, मोशी व केळगाव अशा पंचक्रोशीतील सर्वच गावातील रहदारीवर परिणाम झाला आहे.

चऱ्होली बुद्रक या ठिकाणी असणाऱ्या विविध शैक्षणिक संस्थांमधून परिसरातील सर्व विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, चऱ्होलीचा पूल दुरुस्तीच्या कारणास्तव वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांना पायी प्रवास करून शिक्षणासाठी यावे लागत आहे. कारण वाहतूक पूर्ण बंद असल्यामुळे शैक्षणिक संस्थांच्या स्कूलबस पुलावरून जाऊ शकत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पायपीट करत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

Charholi Bridge Closure
Weather Change Health Issues: बदलत्या हवामानाचा फटका; तळेगाव दाभाडेत रुग्णसंख्येत वाढ

औद्योगिक वाहतुकीवर परिणाम

फुलगाव, मरकळ, धानोरे या सर्व ठिकाणी मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत. या औद्योगिक वसाहतींमधून विविध आंतरराष्ट्रीय कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्यांमधून तयार होणारे औद्योगिक साहित्य भोसरी, पिंपरी-चिंचवड या ठिकाणच्या मोठ्या कंपन्यांकडे नेण्यासाठी जी वाहतूक होत आहे ती मुख्यतः चऱ्होलीच्या पुलावरूनच आजपर्यंत होत आहे. औद्योगिक वाहतुकीचा कणा असणाऱ्या या पुलावरील वाहतूक बंद असल्यामुळे संपूर्ण औद्योगिक क्षेत्राला मोठा आर्थिक फटका बसत आहे. चिखलीतील औद्योगिक अतिक्रमण काढल्यापासून भोसरी, पिंपरी चिंचवड आणि तळेगाव, चाकणमधील औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणावर या एमआयडीसीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत पूल बंद असल्यामुळे औद्योगिक आस्थापनासाठी मटेरियल उशिरा मिळत असल्यामुळे एकूण उत्पादन खर्चात वाढ होत आहे. त्याचा आर्थिक फटका संपूर्ण औद्योगिक क्षेत्राला बसत आहे.

शालेय विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. चऱ्होलीचा पूल वाहतुकीसाठी लवकरात लवकर सुरू करण्यात यावा. परिसरातील सर्व नागरिकांची मागणी असून, प्रशासनाने याची लवकर दाखल घेणे गरजेचे आहे.

नितीन काळजे, नगरसेवक, मनपा

Charholi Bridge Closure
Pimpri Chinchwad Sports Club Project: पिंपरी-चिंचवडचा बहुउद्देशीय स्पोर्ट्स क्लब प्रकल्प कागदावरच; खेळाडूंमध्ये नाराजी

आळंदीतील वाहतुकीवर वाढला ताण

आळंदी देवाची हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी वाहतूककोंडी होऊ नये, म्हणून आजपर्यंत चऱ्होलीतील पुलावरून सर्व वाहतूक वळविण्यात आली होती. मात्र, आता चऱ्होलीचा पूल वाहतुकीस बंद केल्यामुळे सर्व वाहतूक आळंदी मार्गे सुरू आहे. आळंदीतील रस्ते अरुंद असल्यामुळे आळंदीत मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे. सध्या लग्नसराई सुरू असल्यामुळे आळंदीतील धर्मशाळा आणि कार्यालयांमधून मोठ्या प्रमाणावर पाहुणेमंडळी आणि परिसरातील नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे आळंदीत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी वाढली असून याचा विपरीत परिणाम आळंदीपासून लोणीकंद फाट्यापर्यंतच्या वाहतुकीवर होत आहे. या संपूर्ण मार्गावर अवजड औद्योगिक वाहतूक असल्यामुळे आणि रस्तादेखील चांगला नसल्यामुळे संपूर्ण रस्त्यावर वाहतूककोंडी होऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

दोन्ही चऱ्होलींना जोडणारा पूल वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे परिसरातील औद्योगिक क्षेत्राचे आणि विविध व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर पुलाचे काम पूर्ण करून पूल वाहतुकीस सुरू करावा.

सचिन तापकीर, नगरसेवक, मनपा

Charholi Bridge Closure
Pimpri Chinchwad Mayor Election: पिंपरी-चिंचवड महापौरपदासाठी रवी लांडगे यांचा एकमेव अर्ज

व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान

चऱ्होलीतील पुलाच्या दोन्ही बाजूला म्हणजे चऱ्होली खुर्द आणि चऱ्होली बुद्रुक या दोन्ही ठिकाणी हॉटेल्स, कापड व्यवसाय, भाजी मंडई, सलून, ब्युटीपार्लर आणि सेवा क्षेत्रातील विविध व्यवसाय कार्यरत आहेत. परंतु पूल रहदारीस बंद ठेवल्याने सर्व व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे. सध्या दुकानांचे भाडे भरणेदेखील व्यावसायिकांना कठीण होत आहे. कर्ज काढून सुरू केलेल्या व्यवसायांना मोठी खेळी बसली आहे. यामुळे व्यावसायिक चिंतेत आहेत.

चऱ्होलीच्या पुलावरून प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्रातील अवजड वाहतूक होत असल्यामुळे साधारण 15 वर्षे टिकतील, अशा चांगल्या प्रतीच्या बेअरिंग्स बसवायचे काम सुरू आहे. हैद्राबाद येथील कंपनीकडून 7 फेब्रुवारीला आपल्याला या बेअरिंग्स मिळणार आहेत. बेअरिंग्सचे काम झाल्यावर एक्सपान्शन जॉईंटचे काम होणार आहे. त्यानंतर पुलाच्या वरील भागाचे काम होणार आहे. साधारण 15 एप्रिलपर्यंत सर्व काम पूर्ण होईल

अजय पाटील, अभियंता, पीडब्लयूडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news