

चऱ्होली: चऱ्होली बुद्रुक व चऱ्होली खुर्द या दोन्ही चऱ्होलीला जोडणारा सरसेनापती खंडेराव दाभाडे सरदार पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे सदर पूल काही काळासाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे आळंदीतील अवजड वाहतूक या मार्गाने ओळविण्यात आली होती. परंतु, पुलाच्या कामामुळे आळंदी, देहू फाट्यावरील वाहतूक कोंडीत मोठी वाढ होणार आहे.
चऱ्होली आणि परिसरातील वाहतुकीचा कणा असणारा हा सरसेनापती खंडेराव दाभाडे सरदार पूल गेली अनेक दिवसांपासून खड्डेमय झाला होता. पुलाच्या चऱ्होली खुर्दकडील बाजूला बरेच अंतरापर्यंत मोठमोठे खड्डे पडले होते. त्यामुळे वाहतूक संथ गतीने होत होती. ‘पुढारी’ने या पूर्वी 3 जून रोजी ’चऱ्होलीतील पुलावर वाहन चालकांना अपघाताचा धोका : अरुंद पूल, खड्डे देताहेत अपघाताला निमंत्रण’ या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध केली होती. मात्र डोळ्यावर कातडे पांघरलेल्या प्रशासनाला जाग आली नाही. त्यामुळे ‘पुढारी’ने पुन्हा एकदा 25 जून रोजी ’चऱ्होली पुलावर अपघाताचा धोका : प्रशासनाची एकमेकांकडे बोटे, नागरिक त्रस्त’ या मथळ्यासह नागरिकांच्या सर्व मागण्या प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र, तरीही प्रशासनाने वेळकाढू पणा केला. पण ’देर आये दुरुस्त आये’ या उक्तीनुसार उशिरा का होईना प्रशासनाला जाग आली हे चांगले झाले.
चऱ्होली बुद्रुक, चऱ्होली खुर्द, आळंदी, धानोरे, सोळू, मरकळ, तुळापूर, फुलगाव या सर्व भागासाठी चऱ्होलीचा पूल म्हणजे जीवन वाहिनी आहे. कारण आळंदी हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असल्यामुळे सर्व जड वाहतूक चऱ्होलीमार्गे वळवण्यात आली होती. त्यामुळे आळंदीतील वाहतुकीवर ताण पडत नव्हता. आता आळंदीतील वाहतुकीवर मोठा ताण निर्माण होऊन त्यामुळे आळंदीपासून लोणीकंद फाट्यापर्यंत वाहतूक कोंडी होणार आहे. आळंदीतील अंतर्गत रस्ते अरुंद असल्यामुळे संपूर्ण आळंदी शहरात देखील या पुढील काळात मोठी वाहतूक कोंडी राहणार आहे. त्याचा महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून येणाऱ्या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. आता लग्नसराई चालू झाल्यामुळे आळंदीत धर्मशाळा आणि कार्यालयाच्या सर्व परिसरात आणि रस्त्याने मोठ्या प्रमाणावर पाहुणेमंडळी आणि वऱ्हाडी मंडळींची गर्दी आहे. तसेच आजूबाजूचे परिसरातील देखील सर्व नागरिक कायमच लग्नसराईमुळे आळंदीत येत आहेत. चऱ्होलीतील पुलामुळे आळंदी येथील वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे सोपे होते. आता जोपर्यंत चऱ्होलीतील पूल वाहतुकीसाठी पूर्ववत होत नाही तोपर्यंत आळंदी आणि परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागणार आहे.
अवजड वाहतुकीचा मोठा प्रश्न
धानोरे, मरकळ, फुलगाव या औद्योगिक क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक भोसरी, पिंपरी, चिंचवड या औद्योगिक क्षेत्रात होत असते. कारण भोसरी, पिंपरी चिंचवड येथील मोठ्या कंपन्या आणि आस्थापनांना कच्चा माल पुरविण्याचे आगार म्हणजे आजूबाजूच्या परिसरातील लहान कंपन्या आणि वर्कशॉप आहेत. चिखलीतील अतिक्रमण काढल्यामुळे बहुतेक लघु उद्योजकांनी आजूबाजूच्या परिसरातून आपल्या मालाचे उत्पादन आणि पुरवठा चालू ठेवला आहे. हा सर्व औद्योगिक मालाचा पुरवठा चऱ्होलीच्या पुलावरूनच होत होता. आता पुलाचे काम होत असल्यामुळे औद्योगिक क्षेत्रावर देखील विपरीत परिणाम होणार आहे. कारण जर कच्चामाल वेळेत पोहोचला नाही तर मोठ्या कंपन्यांच्या लाईन बंद पडण्याचा आणि आर्थिक नुकसानीचा धोका आहे. त्यामुळे आजूबाजूच्या सर्व औद्योगिक क्षेत्राचा आर्थिक कणा असलेला चऱ्होलीचा पूल लवकरात लवकर दुरुस्त व्हावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
चऱ्होलीतील नागरिकांना सहा ते सात किलोमीटरचा वळसा
चऱ्होली बुद्रुक आणि चऱ्होली खुर्द गावे इंद्रायणी नदीमुळे वेगवेगळी झाले आहेत. परंतु इंद्रायणी नदीवरील पुलामुळे या दोन्ही गावातील दळणवळण सुलभ झाले होते. पुलाच्या कामामुळे दोन्ही चऱ्होलीतील नागरिकांना आता आळंदीतूनच प्रवास करावा लागणार आहे. यामुळे साधारण सहा ते सात किलोमीटरचा वळसा मारावा लागणार आहे. त्यात देहू फाटा आणि आळंदीतील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. या पुलामुळे साधारण एक किलोमीटरचा काही मिनिटांचा प्रवास आता तास, अर्धा तास वेळ जाऊन मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
चऱ्होलीच्या पुलाच्या बेअरिंग व एक्सपान्शन जॉईंट खराब झाले आहेत. त्यांची कालमर्यादा संपली आहे. त्यामुळे आता नवीन बेअरिंग व एक्सपान्शन जॉईंट बसवण्यात येतील. त्यामुळे पुलाच्या क्षमतेत वाढ होईल. सहा महिन्याचे काम आपण तीन ते चार महिन्यांत पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत.
अजय पाटील, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
असे असतील पर्यायी मार्ग
देहू फाट्याकडून येणारी वाहतूक - अलंकापुरम चौक/ तापकीर चौक- पांजरपोळ चौक/ गोडावून चौक मोशी मार्गे इच्छित स्थळी जाता येईल.
मॅगझिन चौकाकडून येणारी वाहतूक अलंकापुरम चौकातून डावीकडे वळून पुणे नाशिक हायवे मार्गे इच्छित स्थळी जातील.
देहू फाटा चौक येथून डावीकडे वळून भारतमाता चौक पुणे नाशिक हायवे मार्गे इच्छित स्थळी जाता येईल.
तुळापूरकडून येणारी वाहतूक मरकळ गावातून उजवीकडे वळून -कोयाळी गाव- कोयाळी कमान-चाकण शिक्रापूर हायवे मार्गे इच्छित स्थळी.
चऱ्होलीचा पूल हा परिसरातील वाहतुकीचा आर्थिक कणा असून, लवकरात लवकर हा पूल पूर्वीच्या क्षमतेपेक्षा जास्त क्षमतेने कार्यरत व्हावा. पुलावरील मोठे जीवघेणे खड्डे बुजवावेत. त्याचप्रमाणे चऱ्होली बुद्रुक आणि चऱ्होली खुर्द या दोन्ही चऱ्होलीच्या हद्दीतील रस्ते देखील खड्डेमुक्त आणि रुंद करावेत म्हणजे सुरक्षित प्रवास होऊन वाहतूक कोंडी होणार नाही.
नागरिक