

पिंपरी: स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी आणि सीमा साळवे यांचा हा प्रभाग आहे. उच्चभू्, मध्यवर्गीय, झोपडीधारक, कामगार असा सर्व वर्गातील मतदारांचा या प्रभागात वास्तव्य आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल झाल्याने अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. भाजपाकडून माजी नगरसेवक विलास मडिगेरी, माजी नगरसेविका नम्रता लोंढे यांच्यासह अनेक जण इच्छुक आहेत.
भाजपातून राष्ट्रवादीत गेलेल्या सीमा साळवे व तुषार सहाणे तसेच, माजी नगरसेवक संजय बावळे, माजी आमदार विलास लांडे याचे सुपुत्र माजी नगरसेवक विक्रांत लांडे, सोनाली उदावंत, संजय उदावंत, संदीपान झोंबाडे, माधुरी लोखंडे, विजय लोखंडे हे इच्छुक आहेत. तसेच, पंकज पवार, लक्ष्मण नागटिळक, सूर्यकांत जाधव, अशोक मोरे, दत्ता शेटे, अस्मिता सावंत, सरिता कुऱ्हाडे, अश्विनी वाबळे, पूजा लांडगे, कोमल साळुंखे, राहुल रस्ते, जावेश शहा, बाळासाहेब जाधव, निखिल काळकुटे, इंद्रायणी काळकुटे, लक्ष्मी जाधव, मीना पारडे, गीता महेंदू, बाळासाहेब मोरे, सालार शेख, बन्सी पारडे, नीलेश मुटके, भाऊसाहेब डोळस, निखिल शिंदे, ॲड.प्रशांत बचुटे आदी इच्छुक आहेत. प्रभागात भाजपा व राष्ट्रवादी अशी बरोबरी असल्याने कोणी बाजी मारणार, याकडे लक्ष लागले आहे. विरोधक एकत्र आल्याने भाजपाला विजय सोपा नसल्याचे चित्र आहे.
प्रभागातील परिसर
जय गणेश साम्राज्य, जलवायू विहार, केंद्रीय विहार, पीएमआरडीए सेक्टर क्रमांक 12 गृहप्रकल्प, संत नगर, महाराष्ट्र कॉलनी, इंद्रायणीनगर, खंडेवस्ती, गवळीमाथा, बालाजीनगर आदी
एमआयडीसी भागात रस्ते विकास
झोपडपट्टी आणि एमआयडीसी भागात रस्ते विकसित करण्यात आले आहेत. काही भागात ड्रेनेज लाइन व जलवाहिनी टाकण्यात आली आहे. वीज खंडित होऊ नये म्हणून फिडर उभारण्यात आले आहेत. इंद्रायणीनगर येथे उद्यान विकसित केले आहेत. चौक, वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावले आहेत. झोपडपट्टी भागात स्वच्छतागृहाची व्यवस्था केली आहे. गवळी माता झोपडपट्टीत शून्य कचरा प्रकल्प यशस्वीपणे राबविला जात आहे.
प्रभागातील जागांचे आरक्षण
अ-एससी
ब-ओबीसी महिला
क-सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
एसआरए योजनेला रहिवाशांचा विरोध
बालाजीनगर, खंडेवस्ती, गवळी माथा या झोपडपट्टी भागात एसआरए योजना राबवण्याचा घाट घालण्यात आला आहे; मात्र त्यात मोठा गैरव्यवहार झाल्याची तक्रार झोपडपट्टीधारकांकडून करण्यात येत आहे. एमआयडीसी भागातील कचरा नियमितपणे उचलला जात नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसतात. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या अपुरी असल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. झोपडपट्टी भागात गढूळ पाणी येत असून, सोसायटी भागात कमी दाबाने पाणी येते. एमआयडीसी भागात रस्त्याच्या कडेने स्ट्राँम वॉटर लाईन नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर जमा होते. वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याची समस्या कायम आहे. वाहतूक कोंडी वारंवार होत असल्याने वाहनचालक त्रस्त आहेत. रस्ते वारंवार खोदले जात असून, त्याची योग्य प्रकारे दुरुस्ती केली जात नाही. झोपडपटी भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मुलांना खेळाचे मैदान नाही. इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल वारंवार दुरुस्त करण्यात येत असल्याने खेळाडूंना नियमितपणे सराव करता येत नाही.