

सासवड: पुरंदरमधील मुख्य बाजारपेठ असलेल्या सासवड नगरपालिका निवडणुकीचा बार 3 डिसेंबरला उडणार आहे. आपल्या प्रभागातील लढत एकास एक व्हावी की तिरंगी, चौरंगी व्हावी, कशात किती फायदा आणि तोटा आहे, याचे गणित मांडून आता नमस्कार, चमत्काराचा खेळ सुरू होईल. सरत्या वर्षाला रामराम करताना आणि उगवतीच्या सूर्याला नमस्कार करताना हौशे, नवशे, गवशे उमेदवार रिंगणात राहू नयेत, यासाठीही नमस्कार, चमत्काराचा खेळ सुरू होणार आहे. उद्या माघारीची अंतिम तारीख आहे. 2 डिसेंबरला मतदान आहे. दरम्यान येथे शिवसेनेने खाते उघडले असून, हेमलता इनामके या बिनविरोध नगरसेविका झाल्या आहेत.
बुधवारी (दि. 19) छाननीमध्ये नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या 15 अर्जांपैकी 6 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले, तर 9 अर्ज बाद करण्यात आले. त्याचप्रमाणे 11 प्रभाग आणि 22 नगरसेवकपदांसाठी दाखल झालेल्या 129 अर्जांपैकी 71 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून, 58 अर्ज अपात्र ठरले असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी दिली.
नगराध्यक्षपदासाठी 6 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. यामध्ये भाजपकडून माजी नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, शिवसेनेकडून माजी नगरसेवक सचिन भोंगळे, महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे (उबाठा) अभिजित जगताप, तसेच माजी उपनगराध्यक्ष वामन जगताप व अपक्ष दत्तात्रेय घाटे आणि निकिता धोत्रे या उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत. तसेच प्रभाग 11 ’अ’मध्ये भाजपच्या उमेदवार राजश्री वैभव इनामके यांना पक्ष उमेदवारी अर्ज वेळेत न मिळाल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. त्यामुळे येथे शिवसेनेच्या हेमलता मिलिंद इनामके यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला आहे.
सासवडला नगरपालिका निवडणुकीचा रणसंग््रााम पेटला आहे. पुरंदरमध्ये शिवसेनेचे आमदार, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे विरुद्ध माजी आमदार भाजपचे संजय जगताप यांच्यात मुख्य लढत होईल असे चित्र आहे. इच्छुकांची संख्या प्रचंड आहे. लोकांनी इर्षेने अर्ज दाखल केले. कुणी इच्छेने तर कुणी डमी म्हणून अर्ज भरला आहे. रंगत जोरदार आहे. काट्याच्या लढती करण्यासाठी सासवडचे कारभारी बाह्या मागे सारून पुढे सरसावले आहेत. या साऱ्यात आपले गणित जमण्यात, बिघडण्यात कुणाची उमेदवारी अडचणीची ठरू शकते, याची मांडणी महत्त्वाची. त्यामुळे उद्याचा दिवस सासवड नगरपालिका निवडणुकीत महत्त्वाचा आहे.
भाजप आणि शिवसेनेतच येथे घमासान होणार आहे. सद्या सत्ताधारी महायुतीतील प्रमुख पक्ष असलेला भाजपचे सासवड नगरपालिकेत प्राबल्य आहे. गेल्या पाच वर्षात सत्ता नसल्याने महायुतीतून बऱ्यापैकी आउटगोइंग झाले होते. विशेषतः महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते सत्तास्थानाच्या वळचणीला गेले होते. त्यामुळे सासवड शहरातील समीकरणे बदलली आहेत. या निवडणुकीत त्या सगळ्यांचा हिशेब चुकता करण्याची नामी संधी आल्याने फंटफुटवरील कार्यकर्ते बाह्या सरसावून कामाला लागल्याचे चित्र आहे. पै-पाहुणे, नाती-गोती, मित्र परिवाराचे गणित जमवून हा डाव शहरात खेळण्याची तयारी सुरू आहे. भाजपनेही यंदा पक्षविस्ताराचा अंदाज घेण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे.