

देहूगाव: देहू शहरासह येलवाडी परिसरात विषाणूजन्य ताप आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. येलवाडी ग्रामपंचायत हद्दीतील इंद्रायणी नदीकाठचा गोविंद पार्क, सांगुर्डी फाटा परिसर तसेच देहू शहरातील विठ्ठलवाडी, भैरवनाथ चौक, नवचैतन्य सोसायटी गल्ली क्रमांक पाच आदी भागांत तापाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पावसामुळे शहर व परिसरातील अनेक भागांत पाणी साचून राहत आहे. त्यातच तुंबलेले ड्रेनेज, नाल्यांमध्ये साचलेली घाण आणि मोठ्या प्रमाणात वाढलेले गवत यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी ताप, जुलाब, उलट्या यांसह डेंग्यूसदृश आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे.
खासगी दवाखाने हाऊसफुल्ल
देहू व येलवाडी परिसरातील खासगी दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे. काही रुग्णालयांमध्ये डेंग्यूसह विविध प्रकारच्या तापाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काही ठिकाणी चार ते पाच डेंग्यूचे रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती
पावसाचे पाणी अनेक ठिकाणी साचून राहत असल्याने डासांची उत्पत्ती होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर काही भागांतील ड्रेनेजची नियमित स्वच्छता होत नसल्याने घाण व पाणी साचले आहे. शहर आणि परिसरातील मोकळ्या जागांमध्ये गवतही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. साचलेले पाणी, तुंबलेले नाले, वाढलेले गवत आणि अस्वच्छ परिसर यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
उपाययोजना करण्याची मागणी
डेंग्यूचा धोका वाढत असताना रुग्णसंख्या वाढल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देणे गरजेचे आहे. देहू नगरपंचायत आणि येलवाडी ग्रामपंचायत प्रशासनाने संभाव्य डेंग्यूग्रस्त भागांची तातडीने पाहणी करून स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
जनजागृतीचा अभाव
साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा करणे, तुंबलेले ड्रेनेज व नाले स्वच्छ करणे, वाढलेले गवत काढणे, डास प्रतिबंधक औषधांची फवारणी तसेच आवश्यक त्या ठिकाणी धूर फवारणी करणे आवश्यक आहे. तसेच, आरोग्य विभागामार्फत नागरिकांमध्ये डेंग्यू प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्याची मागणीही होत आहे.
साफसफाईची मागणी
घराच्या परिसरात पाणी साचू न देणे, पाण्याची भांडी झाकून ठेवणे, घराभोवती स्वच्छता राखणे आणि डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात यावे. डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढून परिस्थिती हाताबाहेर जाण्याची वाट न पाहता प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा देहू-येलवाडी परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
काय काळजी घ्याल?
घरातील कुलर, कुंड्या, पाण्याच्या बादल्या, छतावरील जुने टायर किंवा डबे यांमध्ये पाणी साठू देऊ नका.
आठवड्यातून किमान एक दिवस घरातील पाण्याचे सगळे ड्रम, टाक्या रिकाम्या करून स्वच्छ सुकवाव्यात.
खिडक्या आणि दरवाजांना जाळ्या बसवून घ्या.
मच्छरदाणीचा वापर करा .