

पिंपरी: ‘हनी ट्रॅप’सह अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या प्रफुल्ल लोढा याच्या विरोधात पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 17 जुलै रोजी बावधन पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रफुल्ल रायचंद लोढा (62, रा. जामनेर, जि. जळगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कोथरूड येथील 36 वर्षीय महिलेने बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Latest Pimpri News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित महिलेला तुमच्या पतीला नोकरी लावतो, असे सांगून 27 मे 2025 रोजी रात्री आठ वाजता बालेवाडीतील एका हॉटेलमध्ये बोलावले. तुझ्या पतीला नोकरी हवी असेल, तर मला तुझ्याशी शारीरिक संबंध ठेवू दे, अशी मागणी केली. त्यावेळी महिलेने नकार दिला; मात्र तरीही आरोपीने महिलेला धमकावून तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले, असा गंभीर आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे.
प्रफुल्ल लोढा याच्यावर मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलिस ठाण्यांमध्ये एका 16 वर्षीय मुलीसह तिच्या मैत्रिणीवर अत्याचार, अश्लील छायाचित्र काढणे, त्यांना डांबून ठेवणे आणि धमकावणे याबाबत गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान, 3 जुलै रोजी साकीनाका पोलिस ठाण्यात पोस्को, बलात्कार, खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर 14 जुलै रोजी अंधेरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोक्सो, बलात्कार व महनी ट्रॅपफचा गुन्हा नोंदवण्यात आला. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी 5 जुलै रोजी प्रफुल्ल लोढा याला अटक केली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी 20 जुलै रोजी प्रफुल्ल लोढा हा भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय, विश्वासू कार्यकर्ता असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. त्यामुळे राज्याच्या राजकारणात या प्रकरणामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
पीडित महिलेच्या फिर्यादीवरून प्रफुल्ल लोढा याच्याविरोधात बलात्कार आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो मुंबई पोलिसांच्या अटकेत असून, त्याचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- अनिल विभुते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बावधन.