

पिंपरी: निगडी प्राधिकरणातील वृद्ध उद्योजकाच्या घरात पिस्तुलाचा धाक दाखवून सुमारे 6 लाख 15 हजारांचा ऐवज लुटणार्या दरोडेखोरांचा 48 तास उलटल्यानंतरही शोध लागला नाही. यातील विशेष बाब म्हणजे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बसवलेले बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिस तपासाला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पोलिसांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
चंद्रभान अगरवाल (76) यांच्या निगडी प्राधिकरण येथील घरावर शनिवारी (दि. 19) रात्री साडेनऊच्या सुमारास चोरट्यांनी दरोडा घातला. दरोडेखोरांनी घरात प्रवेश करून पिस्तुलाचा धाक दाखवून अगरवाल हातपाय बांधले. त्यांच्या तोंडावर चिकटपट्टी लावून कपाटातील सोन्याच्या बांगड्या, नथ, सोनसाखळी, घड्याळे, चांदीची वीट, भांडी, रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे असा सुमारे 6 लाख 15 हजारांचा ऐवज लुटून नेला. (Latest Pimpri News)
दरम्यान, या टोळीने अगरवाल यांच्या बंगल्याजवळ असलेल्या वॉचमन आणि त्याच्या कुटुंबियांनाही एका खोलीत बंद करून बाहेरून कडी लावली होती. ही संपूर्ण घटना अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आली.
घटनेनंतर निगडी पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांनी तपासाला सुरुवात केली आहे. मात्र, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने आरोपींचा माग काढण्यात अडथळा निर्माण झाला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत बसवलेले बहुतांश कॅमेरे नादुरुस्त असल्यामुळे पोलिसांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
दरोडेखोरांनी वापरलेली वाहने, त्यांच्या हालचाली, प्रवेश व पलायनाच्या दिशा याचा ठावठिकाणा लागू न शकल्याने पोलिसांची पथके अजूनही अंधारात चाचपडत आहेत. निगडी पोलिस तपास करत आहेत.