पिंपरी: बहीण-भावाच्या प्रेमळ नात्याचा ऋणानुबंध जपणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या सणाच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारपेठेत राखी खरेदीसाठी महिलांची गर्दी दिसत आहे. चिमुकल्यांसाठी लायटिंग राख्या, छोटा भीम, डोरेमॉन, मोटू पतलू, श्री गणेशा, श्रीकृष्ण अशा राख्या बाजारात विक्रीस आल्या आहेत. या राख्यांना सर्वांधिक पसंती मिळत आहे.
एकीकडे आपल्या भाऊरायाच्या पसंतीस उतरेल, अशी राखी घेण्यासाठी महिलांनी बाजारात गर्दी केली होती, तर दुसरीकडे आपल्या बहिणीसाठी भेटवस्तू खरेदी करताना युवावर्ग व्यस्त असल्याचे पहावयास मिळत आहे. रक्षाबंधनानिमित्त बाजारपेठेत आकर्षक राख्या विक्रीस दाखल झाल्या आहेत. महिलांना या राख्या भुरळ घालत आहे. मात्र, यंदा महागाईमुळे दरांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे राखी विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. (Latest Pimpri News)
बाजारपेठेत विविध प्रकारच्या आकर्षक राख्यांसह पारंपरिक गोंडा राख्यांसह विविध प्रकारच्या राख्या बाजारात विक्रीस दाखल झाल्या आहेत. कमीतकमी पाच ते दहा रुपयांपासून अगदी हजार रुपये आणि त्याहूनही अधिक किंमतीच्या विविध प्रकारच्या राख्या बाजारपेठेत उपलब्ध आहेत.
महिलांकडून राख्यांच्या दुकानात खरेदीसाठी गर्दी केली जात आहे. दुसरीकडे व्यावसायिकांमध्येदेखील उत्साहाचे वातावरण आहे. किरकोळ विक्रेते आणि सामान्य नागरिकांकडून खरेदीसाठी गर्दी केली जात आहे. यंदा राख्यांची मागणी वाढली असून, राख्यांच्या किंमतीत काहीशी वाढ झाली आहे.
कुंदन, खडे, मणी वर्कच्या राख्यांना मागणी
चिमुकल्यांसाठी लायटिंग राख्या, छोटा भीम, डोरेमॉन, मोटू पतलू, श्री गणेशा, श्रीकृष्ण अशा राख्या बाजारात विक्रीस आल्या आहेत. कुंदन वर्क आणि साध्या राख्यांना जास्त मागणी आहे. लायटिंग, लाकडी, पपेट, कडा राखीसह पारंपरिक देव राखी अशा विविध प्रकारच्या राख्या बाजारात विक्रीस आल्या आहेत. दरम्यान, राख्यांमधील नावीन्यता म्हणजे गेल्या वर्षाप्रमाणे याहीवर्षी लायटिंग राखीमध्ये स्पिनर लायटिंग राखी बाजारात आल्या आहेत. स्पिनर राखीस असलेले बटन दाबले की विविध रंगीत लायटिंग राखीची आकर्षकता वाढवते.