

पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने शहर कार्यकारिणी जाहीर केली आहे. मात्र, ही कार्यकारिणी जाहीर होताच अनेक पदाधिकार्यांनी राजीनाम्याचे शस्त्र बाहेर काढले आहे.
तर काहींनी थेट आत्मदहन करण्याचाच इशारा दिला आहे. कार्यकारिणीची निवड करत असताना त्यामध्ये ठराविक कार्यकर्त्यांना चांगले पद देण्यात आले आहे. जुन्या अनुभवी कार्यकर्त्यांवर अन्याय केला असून, अनेक मोठ्या पदांवर असलेल्या पदाधिकाायांचे खच्चीकरण करण्यात आल्याचे आरोप केला जात आहे. (Latest Pimpri News)
भाजपच्या शहर कार्यकारिणीची घोषणा बुधवारी (दि. 28) रात्री उशीरा करण्यात आली. कार्यकारी जाहीर होऊन 24 तास होत नाही तेाच राजीनाम्याचे सत्र सुरू झाले आहे. सुरुवातीला उपाध्यक्षपदी निवड झालेल्या माजी उपमहापौर तथा युवा मोर्चाचे माजी शहराध्यक्ष तुषार हिंगे यांनी पदाचा राजीनामा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्याकडे दिला.
तर, माजी शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी देखील उघडपणे नाराजी व्यक्त करत शहराध्यक्षांवर आरोप केले आहेत. आमदार महेश लांडगे यांच्या उमेदवारीस विरोध केल्याने कार्यकारिणीतून वगळल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सोशल मीडियावर नाराजीचा सूर
तसेच, माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक राजू दुर्गे, माऊली थोरात, महेश कुलकर्णी, अमोल थोरात, अजय पाताडे अशा अनुभवी पदाधिकार्यांनाही डावलण्यात आले आहे. नव्या कार्यकारिणीत स्थान न मिळाल्यामुळे त्यांचे समर्थक आणि स्थानिक कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
सोशल मीडियावर नाराजीचा सूर उमटू लागला असून, पक्षांतर्गत काही ताणतणावही स्पष्ट होऊ लागले आहेत. नव्या कार्यकारिणीत डावलल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. या निर्णयामुळे पक्षांतर्गत गटबाजीचे संकेत मिळत असून, कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढण्याची चिन्हे आहेत.
तर, दिघी, मोशी, चर्होली मंडलाध्यक्ष संतोष तापकीर हे गेली 30 वर्षांपासून भाजप कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत. मात्र, त्यांना सरचिटणीस किंवा कार्याध्यक्ष पद न देता सदस्य पद दिल्याने त्यांनी थेट भाजप कार्यालयासमोर येत्या दोन दिवसांत आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत तापकीर म्हणाले, की सन 2014 पासून पक्षाची राज्यापासून केंद्रामध्ये सत्ता आहे. मात्र, आम्हा एकनिष्ठ कार्यकर्त्यांना पदापासून वंचित ठेवले आहे. संघटनेमध्ये खच्चीकरण करत असल्यामुळे नेतृत्वावर व संघटनेवरील विश्वास उडाला आहे. योग्य विचार करणार नसाल तर, येत्या दोन दिवसांत निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
कोणीही नाराज नाही
तीनशे जणांमधून कार्यकारणीची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांना या कार्यकारिणीमध्ये संधी मिळाली नाही, त्यांना दुसरी पदे देऊन त्यांची नाराजी दूर केली जाईल. कोणा एका आमदाराच्या कार्यकर्त्यांची नाही तर, संपूर्ण शहराची ही कार्यकारिणी आहे. त्यामुळे कोणीही नाराज नाही, असे भाजपाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी सांगितले.