

पिंपरी: चेहऱ्यावरील फोडांच्या त्रासामुळे अस्वस्थ झालेल्या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २१) सायंकाळी आंबेठाण येथे घडली. पती पेट्रोल भरण्यासाठी घराबाहेर गेल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात हा प्रकार घडला आहे.
अश्विनी असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पती संदीप यांनी पोलिसांना खबर दिली आहे. अश्विनी यांना त्वचेचा त्रास होऊन चेहऱ्यावर फोड आले होते. त्यामुळे त्या पतीसोबत दवाखान्यात जाणार होत्या.
दरम्यान, २१ जुलै रोजी सायंकाळी सातच्या सुमारास अश्विनी यांचे पती संदीप हे पेट्रोल टाकून येतो, असे सांगून दुचाकीवरून आंबेठाण चौक येथे गेले. सायंकाळी साडेसातच्या सुमारास ते परतले असता घराचा दरवाजा आतून बंद होता. वारंवार हाका मारूनही प्रतिसाद न मिळाल्याने सोसायटीतील राकेशकुमार, मंगेश बनकर तसेच इतर रहिवासी जमा झाले. त्यानंतर डायल ११२ वर फोन करून पोलिसांना बोलवण्यात आले.
पोलिस आल्यानंतर दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता किचनमधील स्लॅबवरील लोखंडी हुकाला सुताची दोरी बांधून अश्विनी पाटील यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यांना तातडीने खाली उतरवून रुग्णवाहिकेतून चाकण येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.
चेहऱ्यावर फोड आल्यामुळे अश्विनी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होत्या. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे मृत अश्विनी यांच्या पतीने सांगितले आहे. पोलिसांकडून या घटनेचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट होईल.
- जितेंद्र कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चाकण उत्तर पोलिस ठाणे