

पिंपरी: कंपनीतून बेपत्ता व्यक्तीचा शोध घेताना त्याचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून दोघांना अटक केली आहे. दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून हा प्रकार झाल्याचे समोर आले आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींनी नदीत फेकला असल्याची कबुली दिली. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
शानू रफिक मोहम्मद शेख (रा. विलेपार्ले, मुंबई) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शरद गौतम घरद (रा. काळेवाडी) व गिरीधर वाल्मीक रेडे (रा. मोई, खेड) या दोघांना अटक केली आहे. (Latest Pimpri News)
पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शानू हे कामानिमित्त ताथवडे येथील कंपनीत अवघ्या एक दिवसांपूर्वीच आले होते; मात्र ते घरी न पोहचल्याने आणि मोबाईल बंद आढळल्याने कंपनीतील मॅनेजरने वाकड पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद केली.
या प्रकरणाचा तपास सुरू असताना, शेख यांचा मृतदेह पेरणे फाटा येथील भीमा नदीपात्रात आढळून आला. नातेवाईकांनी मृत व्यक्तीची ओळख पटवताच लोणीकंद पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांची तपासची चक्रे फिरवत दोघांना अटक केली आहे.
संशयित शरद घरत याने जेवणाच्या बहाण्याने काळेवाडी येथे शेख याला बोलावून घेतले. दारूच्या नशेत किरकोळ वादातून दगडाने ठेचून त्याचा खून करून मृतदेह भीमा नदीपात्रात फेकल्याचे उघड झाले.
पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व गुन्हे शाखा युनिट चारच्या अधिकारी आणि अंमलदार यांच्या पथकाने ही कारवाई केली.